पती-पत्नीचा वाद अन् बदला घेण्यासाठी पतीनेच केला पत्नीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, डोंबिवलीत नात्याला काळीमा फासणारी घटना
Dombivli Crime : पतीचा दुसऱ्या लग्नाचा साखरपुडा झाला असून 29 एप्रिलला त्याचं लग्न होणार आहे. त्याविरोधात न्याय मिळावा म्हणून त्याची पत्नी दारोदारी फिरताना दिसत आहे.
ठाणे : पती पत्नीच्या वादातून पतीने पत्नीचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत समोर आला आहे. या प्रकरणी पीडित पत्नीने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार मानपाडा पोलिसांनी पती विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. महेश पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे.
आरोपी महेश हा डोंबिवली खिडकाळी भागात राहतो. त्याची 28 वर्षीय पीडित तरुणीशी तीन वर्षांपूर्वी डोंबिवलीतील एका मंदिरात ओळख झाली होती. ओळखीतून काही महिन्यात दोघात प्रेमसंबंध निर्माण होऊन दोघांनी सहमतीने हिंदू धार्मिक रीतीरिवाजाप्रमाणे 6 मार्च 2020 रोजी विवाह केला. त्यानंतर दोघे पती-पत्नी म्हणून कल्याण-शीळ मार्गावरील एका हायप्रोफाईल सोसायटीत राहत होते. त्यातच गेल्या एक ते दीड वर्षापासून आरोपी पती महेशला दुसरा विवाह करण्यासाठी पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरु केला. मात्र पती असल्याने पीडित पत्नी त्याचे अत्याचार सहन करीत होती.
गेल्या काही महिन्यापासून पीडित पत्नीचा अधिक छळ करून 10 मार्च 2022 रोजी स्वतःच्या बेडरूममध्ये मोबईल कॅमेऱ्यातून गुपचूपपणे आरोपी पतीने पती पत्नीचा शारीरिक संबंध करतानाचे चित्रीकरण केले होते. त्यानंतर पीडित पत्नीला लोखंडी सळीने मारहाण करत धमकी देत तो तिचा अश्लील व्हिडीओ आरोपी पतीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून व्हायरल केला. पीडित पत्नीने व्हायरल व्हिडीओ प्रकरणी आरोपी पतीला जाब विचारला असता, उलट तिलाच शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. या घटनेमुळे भयभीत झालेल्या पीडित पत्नीने 11 मार्च 2023 रोजी मानपाडा पोलीस ठाण्यात पती विरोधात तक्रार देण्यासाठी धाव घेऊन तक्रार दाखल केली. मात्र आरोपी पतीही तिच्या मागोमाग पोलीस ठाण्यात येऊन तिची माफी मागत आता पुन्हा असे मी करणार नाही असे सांगून तिला घरी नेले.
त्यानंतर दोन दिवसांनी पीडित पत्नीच्या मोबाईलमधील काही फोटो आणि व्हिडीओ आरोपी पतीने डिलीट करत तिला सांगितले की, मी दुसरे लग्न करणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच भिवंडी तालुक्यात राहणाऱ्या एका तरुणीशी आरोपी पतीने गुपचूप सारखपुडा केल्याचे पीडित पत्नीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले. शिवाय येत्या 29 एप्रिल 2023 रोजी तो दुसरा विवाह साखरपुडा झालेल्या तरुणीशी करणार असल्याचे पीडित पत्नीला समजताच, तिने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र त्यावेळी पोलिसांनी तिची तक्रार घेतली नसल्याने पीडित पत्नीने पोलीस उपआयुक्त यांच्याकडे लेखी तक्रर अर्ज दाखल केला. त्यानंतर मानपाडा पोलीस ठाण्यात त्या अर्जानुसार 8 एप्रिल 2023 रोजी गुन्हा दाखल केल्याचे पीडित पत्नीने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, पीडित पत्नीने आरोपी पतीला मानपाडा पोलिसांनी अद्यापही अटक केली नसल्याचे सांगत दुसऱ्यांदा राज्य महिला आयोग, पोलीस आयुक्तांकडे अर्ज दाखल केला. त्या अर्जात पीडित पत्नीने गंभीर आरोप केला की, तिच्या आई-वडिलांचे 25 मार्च 2023 रोजी अपहरण करून पीडितेला धमकी दिल्याचे नमूद केले आहे. शिवाय आरोपी पतीसह त्याचे नातेवाईक उमेश खानवलकर , हनुमान पाटील, दीपक पाटील, आणि आरोपी पतीचे मामा मामी यांच्यावरही मानपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. मात्र गुन्हा दाखल होऊन तीन दिवस उलटून गेले मात्र पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केली नसल्याने पीडित पत्नीच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे तिने अर्जात नमूद केले आहे.
पीडित पत्नी दारोदारी मदतीचा हात मागत आहे, ठार मारण्याच्या धमक्या येत असल्याने पीडित पत्नी तिच्या मित्र-मैत्रिणीच्या घरी राहून न्यायासाठी भटकत असल्याचं चित्र आहे.