(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhandara Gang Rape Case : गोरेगाव पोलिसांनी तयार केलं फरार आरोपीचं स्केच, चेहरा कुठे दिसल्यास तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन
Bhandara Gang Rape Case : भंडारा सामुहिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीचं स्केच तयार. कुठे दिसल्यास त्वरित संपर्क साधावा, पोलिसांचं आवाहन
Bhandara Gang Rape Case : राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या भंडारा-गोंदिया बलात्कार प्रकरणातील (Bhandara Gang Rape Case) मुख्य आरोपीचं स्केच तयार करण्यात आलं आहे. स्केचमधील चेहरा कुठे दिसल्यास तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. भंडारा-गोंदिया सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेवर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे तिची प्रकृती गंभीर आहे. सध्या तिच्यावर नागपुरात उपचार सुरु आहेत. एबीपी माझाही सर्वांना आवाहन करत आहे की, स्केचमध्ये दिसणारा नराधम कुठे दिसला, तर त्वरित पोलिसांशी संपर्क साधा.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यात 35 वर्षीय महिलेवर अत्याचार प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देश हादरला. एकूण 3 आरोपींनी महिलेवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी लुखा उर्फ अमित सार्वे आणि मोहम्मद एजाज अंसारी याला अटक केली आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलीस सध्या तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. हे प्रकरण आता SIT कडे वर्ग करण्यात आलं असून आज SIT कडून पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर फरार आरोपीचं स्केच तयार करण्यात आलं. यात आरोपीचं वय 30 ते 40 वर्षांचं आहे. त्याचा रंग सावळा असून मध्यम बांधा, काळ केस, हलकी दाढी, डाव्या हातात जर्मनचा का, डाव्या हाताच्या बोटामध्ये दोन-तीन अंगठ्या, पांढऱ्या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची फुलपँट, काळ्या रंगाची सँडल टाइप चप्पल असं वर्णन करण्यात आलं आहे.
काय घडलं त्या दोन दिवसांत?
पीडित महिला पतीपासून विभक्त झाली होती. नुकतीच ती गोंदियामध्ये राहणाऱ्या तिच्या बहिणीकडे आली होती. दरम्यान, 30 जुलैला बहिणीसोबत भांडण झाल्यानं तिनं रात्रीच्या सुमारास घर सोडलं. ती गोंदियातील जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कमरगाव या ठिकाणी आईकडे जाण्याच्या बहाण्यानं ती निघाली. रस्त्यात भेटलेल्या अज्ञात आरोपीनं तिला घरी सोडण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं. पण या नराधमानं पुढे तिला घरी सोडलं नाही, तर गोंदिया जिल्ह्याच्या मुंडीपार जंगलात नेऊन 30 जुलैला तिच्यावर पाशवी अत्याचार केला. हा नराधम एवढ्यावरच थांबला नाही, त्यानं दुसऱ्या दिवशीही म्हणजेच, 31 जुलैला पळसगाव जंगलात नेऊन अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला तिथेच सोडून आरोपीनं पळ काढला.
पीडिता कशीबशी जंगलातून निघून भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील कन्हाळमोह गावातील धर्मा ढाब्यावर पोहोचली. तिथे दुचाकी दुरुस्त करणाऱ्या (आरोपी 2) आरोपीसोबत तिची भेट झाली. त्यानंतही घरी सोडण्याच्या बहाण्यानं पीडितेवर पाशवी अत्याचार केले. आरोपीनं आपल्या एका मित्राला सोबत घेत 1 ऑगस्ट रोजी पीडीतेला निर्मनुष्य ठिकाणी नेत पीडितेवर वारंवार अत्याचार केले. त्यानंतर पीडितेला कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कन्हाळ मोह गावाच्या पुलाजवळ सकाळी 8 वाजता विवस्त्र अवस्थेत सोडून तिथून पळ काढला. रात्रभर पीडिता असह्य वेदनांनी विव्हळत रस्त्याशेजारी पडून होती.
पहाटे गावकऱ्यांनी पीडितेला पाहिलं. विवस्त्र, रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत होती. काहीतरी अनुचित प्रकार घडल्याचा संशय आल्यानं गावकऱ्यांनी तात्काळ कारधा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात तिला दाखल केलं. वैद्यकीय तपासणीत महिलेवर अत्याचार झाल्याचं उघडकीस आलं. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. तर दुसरीकडे सुरुवातीचा गुन्हा गोंदिया जिल्ह्यात घडल्यानं भंडारा पोलिसांनी संबंधित गुन्हा गोंदियाच्या गोरेगाव पोलिसाकडे वर्ग केला आहे.