Shubhangi Shinde Suicide : शुभांगी शिंदे आत्महत्या प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्याचा सहभाग, फरार आरोपीला राजकीय पाठबळ? बीड हादरले
Shubhangi Shinde Suicide Case : या प्रकरणी फरार असलेला संदीप काचगुंडे याच्याकडे बीडमधील धारूर तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी होती. त्याला फरार होण्यामध्ये राजकीय पाठबळ मिळालं आहे का अशी चर्चा सुरू आहे.

बीड : बीडच्या शुभांगी शिंदे आत्महत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील पाचवा आरोपी हा भाजपचा पदाधिकारी आहे. संदीप काचगुंडे असं त्याचं नाव असून तो भाजपचा धारूर तालुका अध्यक्ष आहे. संदीप काचगुंडे सध्या फरार असून पोलिस त्याच्या शोधात आहेत.
अंबाजोगाई तालुक्यातील गिता येथील शुभांगी शिंदे हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. या प्रकरणी आरोपी पतीसह सासरा, सासू आणि नणंद यांना अटक करण्यात आली. परंतु यातील पाचवा आरोपी संदीप काचगुंडे हा भाजपचा धारूर तालुका अध्यक्ष आहे. तो मात्र फरार असून त्याला फरार होण्यात राजकीय पाठबळ मिळालं आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना शुक्रवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. तर भाजपचा पदाधिकारी संदीप काचगुंडे याला अटक करण्यासाठी पथक रवाना केल्याची माहिती बर्दापूर पोलिसांनी दिली आहे.
Shubhangi Shinde Suicide Case : हुंड्यासाठी शुभांगीचा छळ, काय आहे प्रकरण?
बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील गीता या गावातील शुभांगी संतोष शिंदे या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ऑप्टिकलचे दुकान टाकण्यासाठी सासरच्या मंडळींनी माहेरावरून पैसे आणण्यासाठी छळ केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे. या प्रकरणी सासरच्या लोकांना पोलिसांनी अटक केली आहे.
अंबाजोगाई आणि धारूर येथे ऑप्टिकलचे दुकान असताना तिसऱ्या दुकानासाठी वारंवार पैशाची मागणी केली जात होती. माहेरच्या लोकांनी पाच लाख रुपये देऊनही आणखी चार लाख रुपयांसाठी शुभांगी शिंदे हिचा छळ सुरू होता. सासरच्यांकडून सातत्याने सुरू असलेल्या त्रासाला कंटाळून शुभांगीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणात शुभांगीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पाच जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पतीसह सासू-सासरे आणि नणंद यांनी हुंड्यासाठी छळ केल्याचं म्हटलं आहे.
या प्रकरणात पती संतोष शिंदे, सासरे विलास शिंदे, सासू सुमन शिंदे,ननंद सीमा शिंदे आणि पतीचे मित्र संदीप काचगुंडे यांच्या विरोधात भाऊ प्रदीप सोळंके याच्या फिर्यादीवरून बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पती, सासू-सासरे, ननंद यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर संदीप काचगुंडे हा अद्याप फरार असून त्याचा शोध बर्दापूर पोलिस घेत आहेत.
ही बातमी वाचा:


















