Beed Crime : जमीन नावावर करुन देत नाही म्हणून जावयाने घेतला सासूचा जीव, तीन महिन्यांनी प्रकरण उघड
Beed Crime : जमीन नावानं करून देत नाही म्हणून जावयाने सासूला मारून शेतामध्येच पुरून टाकल्याची घटना बीडच्या वटाणवाडी या गावात समोर आली आहे.
Beed Crime : सासू-सासऱ्यांसोबत सुनांची भांडणं वगैरे आपण यापूर्वी अनेकदा ऐकले असेल मात्र जमीन नावानं करून देत नाही म्हणून जावयाने सासूला मारून शेतामध्येच पुरून टाकल्याची घटना बीडच्या वटाणवाडी या गावात समोर आली आहे. तीन महिन्यानंतर शेतात पडलेला मृतदेह कुत्र्याने बाहेर काढल्याने सत्य समोर आले. मंदा हरिभाऊ गायकवाड असे मृत महिलेचे नाव आहे. बीड-नगर रोडवर असलेल्या शेतात गुरे सांभाळणाऱ्या गुराख्यांना एक कुजलेला मृतदेह आढळून आला.
जमीन नावची करून देत नाही म्हणून जावयानेच सासूला अन्य दोघांच्या मदतीने संपवल्याचा संशय आहे. कुत्र्यांनी खड्डा उकरल्याने हा प्रकार तब्बल तीन महिन्यांनी उजेडात आला. आष्टी पोलिसांनी प्रल्हाद घुमरे या जावायासह तिघांना ताब्यात घेतले आहे.
बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावर वटाणवाडी येथे राहणाऱ्या मंदा गायकवाड यांचे पती सोळा वर्षापूर्वी बेपत्ता झाले आहेत. त्यांना तीन मुली आहेत. मंदाबाईंकडे लक्ष देणारं कुणी नसल्याचा गैरफायदा घेत भरत गायकवाड, प्रल्हाद घुमरे, सुनील गांगुर्डे हे तिघे मंदाबाईंना जमीन नावावर करून देण्यासाठी यापूर्वी धमक्या देत होते.
मृत मंदा यांना तीन मुली आहेत. तिघीही विवाहित आहेत. मदा यांचा ज्येष्ठ जावई प्रल्हाद घुमरे, त्याचा मित्र सुनील गांगर्डे व भावकीतील भरत गायकवाड हे हे त्यांना 90 गुंठे जमीन नावावर कर म्हणून धमकावायचे, असा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 3 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री मंदा यांना शेतात तुरीला पाणी देण्याच्या बहाण्याने नेले. तिथे त्यांच्या डोक्यात घाव घालून त्यांना संपविले. त्यानंतर शेतातच खड्डा खोदून पुरुन टाकले. मात्र या परिसरामध्ये फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांनी खड्ड्यामध्ये पुरलेला मृतदेह बाहेर काढला आणि त्यानंतर गुरे राखणाऱ्या गुराख्यांनी ही माहिती गावकऱ्यांना दिली.
दरम्यान पोलिसांनी पंचनामा करून सांगाडा तपासणीसाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठविला आहे.
मंदाबाई या 4 नोव्हेंबर 2021 पासून बेपत्ता होत्या. मंदा यांचे भाऊ केरू किसन चितळे यांनी मृतदेहाची ओळख पटवली. प्रथमदर्शनी घातपाताचा प्रकार असल्याने केरू चितळे यांच्या तक्रारीवरून जावई प्रल्हाद घुमरे, सुनील गांगर्डे व भरत गायकवाड या संशयितांविरुध्द खुनाचा गुन्हा नोंद झाला.आष्टी पोलिसांची तिघांनीही ताब्यात घेतले आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha
इतर बातम्या
पत्नीनं पहिलं लग्न लपवलं, त्रासाला कंटाळून पतीनं जीवन संपवलं! दौंडमधील धक्कादायक घटना