Crime News : आश्चर्यच ! तीन दिवसात चोराला उपरती, चोरी केलेले चार तोळ्याचे दागिणे केले परत
Beed News Update : बीडमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली असून चोरीला गेलेले सोन्याचे दागिने चोराने चक्क तीन दिवसांनी परत केले आहेत.
![Crime News : आश्चर्यच ! तीन दिवसात चोराला उपरती, चोरी केलेले चार तोळ्याचे दागिणे केले परत beed crime news update Thief returns stolen jewelery in Beed marathi news Crime News : आश्चर्यच ! तीन दिवसात चोराला उपरती, चोरी केलेले चार तोळ्याचे दागिणे केले परत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/07/841345f4edfb263de9dcfccc94a4b4641675788673172328_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बीड : संधी मिळेल त्यावेळी हात साफ करणारे चोर कधीकधी रिकाम्या हाताने परततात, तर कधी फारसं काही त्यांच्या हाताला लागत नाही. मात्र सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका चोराने चक्क तीन दिवसांनी त्याच घरासमोर दागिने ठेवून पसार झाल्याची घटना बीडमध्ये घडली आहे.
पाडळसिंगीमध्ये राहणाऱ्या सविता काशीद या त्यांच्या मामेबहिणीच्या लग्नासाठी बीडला नातेवाईकांकडे आल्या होत्या. त्यांची आतेबहीण सुनीता मैत्रेही या ठिकाणी मुक्कामी होत्या. या दोघींच्या गळ्यातील गंठण कपाटात ठेवले होते. 27 तारखेला हे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर सविता आणि सुनीता यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
बीड शहर पोलिस ठाण्यात सविता आणि सुनिता यांच्या तक्रारीनुसार अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनीही तपासाला सुरुवात केली. श्वान पथकाच्या मदतीने परिसरात सगळीकडे शोधाशोध केली. मात्र काही उपयोग झाला नाही. अखेर तीन दिवसानंतर दोन्ही गंठण घरासमोर ठेवून चोर तिथून पसार झाला. पोलिसांनी खाक्या दाखवण्याच्या अगोदरच सविता काशी यांना त्यांचे दागिने परत मिळाले.
प्रत्येक शहरामध्ये दररोज कुठे ना कुठे चोरी झाल्याच्या तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल होत असतात. त्यानुसार पोलिस अतिशय गुप्त पद्धतीने तपास करतात. या प्रकरणातही पोलिसांना काही व्यक्तीवर संशय आला होता. त्यामुळे आपलं चोरीचं बिंग उघडं पडण्याच्या अगोदर दागिने चोरणाऱ्याने पोलिसी खाकीला घाबरून दागिने परत सविता यांच्या घरासमोर आणून ठेवले, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक रमेश गायकवाड यांनी दिली.
'पोलिसांच्या तपासानंतर कुणाचे चोरी झालेले दागिने परत मिळाले असल्याच्या बातम्या अनेक वेळा ऐकल्या आहेत. परंतु चक्क सोन्याचे दागिने चोरीला गेल्यानंतर चोरीच्या तिसऱ्याच दिवशी जो सुखद धक्का बसला तो शब्दात वर्णन करता येत नाही. दागिने परत आणून दिलेत यावर विश्वास बसत नाही, अशा भावना सविता काशीद यांनी व्यक्त केल्या आहेत.
सविता काशीद यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला होता. परंतु, चोराला याची कुणकुण लागली, त्यामुळेच त्याने चोरीचे दागिने परत केले असे स्थानिक नागरिकांचे म्हणणं आहे. परंतु, दागिने परत मिळाले याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
महत्वाची बातम्या
शिवसेना नगरसेवक अमरदीप रोडे खून प्रकरणी चार जणांना जन्मठेप, परभणी जिल्हा न्यायालयाचा निर्णय
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)