Beed Crime News: गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याकडून कारागृह अधीक्षकांच्या खाजगी गाडीची धुलाई; बीडच्या जिल्हा कारागृहात नेमकं चाललंय तरी काय?
Beed Crime News: सचिन कृष्णार्थ कदम हा कैदी एका गंभीर गुन्ह्यात दहा वर्षांची जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत आहे. आणि याच कैद्याकडून कारागृह अधीक्षकांची खाजगी गाडी धुतली जाते.

Beed Crime News बीड: बीडच्या जिल्हा कारागृहात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न हा व्हिडिओ पाहून पडला आहे. कारण याच कारागृहात कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांचे खाजगी वाहन एका कैद्याकडून धुतले जात असल्याचं समोर आलंय. सचिन कृष्णार्थ कदम हा कैदी एका गंभीर गुन्ह्यात दहा वर्षांची जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत आहे. आणि याच कैद्याकडून कारागृह अधीक्षकांची खाजगी गाडी धुतली जाते. शिवाय हा कैदी कारागृहाच्या परिसरात मुक्त संचार देखील करत असल्याचं या व्हिडिओ मधून दिसत आहे.
आरटीओ विभागाकडून घेतलेल्या माहितीनुसार MH 27 BV 9517 ही गाडी कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्या मालकीची आहे. 2021 मध्येच या कारचा इन्शुरन्स संपलेला असताना देखील ही गाडी रस्त्यावर फिरते आहे. आणि हीच खाजगी गाडी या कैद्याकडून धुवून घेतली जातेय. बूट पॉलिश, भांडे घासणे आणि कपडे धुऊन घेणे असे वैयक्तिक कामं कैद्याकडून कारागृह अधीक्षक करून घेत असल्याची माहिती कारागृहातील सूत्रांकडून मिळाली. दोन दिवसांपूर्वीच कारागृह परिसरातील मोठ मोठ्या झाडांची कत्तल केल्याने गायकवाड वादात सापडले आहे. या प्रकरणाचा विभागीय कारागृह उपमहानिरीक्षकांकडून आढावा घेण्यात आला. आता त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
नियम काय सांगतो?
कारागृह अधीक्षक एखाद्या कैद्याकडून वैयक्तिक कामे (उदा. त्यांच्या घरात साफसफाई करणे, खासगी गाडी धुणे किंवा इतर वैयक्तिक सेवा) करून घेत असेल, तर ते कायद्याचे उल्लंघन आहे. अशा प्रकरणात तुरुंग कायदा आणि तुरुंग नियमानुसार फौजदारी गुन्हा किंवा शिस्त भंगानुसार निलंबन, बडतर्फी किंवा इतर शिक्षा होऊ शकतात. हे नियम कैद्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि तुरुंग प्रशासनात पारदर्शकता राखण्यासाठी तयार करण्यात आले आहेत.






















