Beed Crime News : अधिकच्या मोबदल्यासाठी चक्क न्यायालयाचा निकालच बदलला, बीड जिल्ह्यातील घटनेने खळबळ
Beed Crime News : न्यायालयाच्या वतीने कार्यालयीन अधीक्षकांनी यांनी दिलेल्या तक्रारीवरून बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Beed Crime News : बीडच्या (Beed) गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका पाझर तलावाच्या मावेजाप्रकरणी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाझर तलावात गेलेल्या जमिनीच्या मोबदल्यात मावेजा मिळावा या प्रकरणी 2016 साली बीडच्या न्यायालयाने (Beed Court) निर्णय दिला होता. मात्र, काही दिवसांनी या निकालाचे एकूण 6 पानेच बदलण्यात आल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आता या प्रकरणी अज्ञात लोकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील पाझर तलावासाठी जमीन संपादित करण्यात आली होती. यावेळी भूसंपादन अधिकाऱ्यांनी जमिनीचा मावेजा मंजूर केला होता. मात्र, भूसंपादन अधिकाऱ्यांकडून देण्यात येणारा मावेजा तक्रारदारांना मान्य नव्हता. त्यामुळे मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या नाराजीने वाढीव मावेजा मिळावा, यासाठी न्यायालयात पाच प्रकरणे दाखल करण्यात आली होती. त्यानुसार 2 जुलै 2016 रोजी तत्कालीन सहदिवाणी न्या. व स्तर न्यायधीश साजिद आरेफ सय्यद यांनी संबंधित प्रकरणे निकाली काढली होती. मात्र, न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पानात काही दिवसांनी हस्तक्षेप करून निकालाचे सहा पानेच बदलण्यात आले. दरम्यान, सहायक सरकारी वकील यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी हा प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. त्यानुसार आता न्यायालयाच्या वतीने कार्यालयीन अधीक्षकांनी यांनी दिलेल्या तक्रारीवरून बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असा झाला उलगडा..
न्यायालयाच्या निकालाच्या प्रतीचा कागद हा जाड असतो, मात्र बदलण्यात आलेली कागद तेवढी जाड नाहीत. सोबतच, नवीन पानावर वाढीव मावेजाची रक्कम लिहिण्यात आली होती. त्यामुळे, सहायक सरकारी वकिलांनी या प्रकरणातील प्रमाणित प्रतींची मागणी करून पाहणी केली. यावेळी निर्णयातील पान क्रमांक 9, 10, 17, 19, 20 व 25 हे बदलल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे निकालाच्या पानात फेरफार करून पानेच बदलण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले.
अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, या सर्व घटनेची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. तर, जिल्हा व सत्र न्यायालयाचे अधीक्षक नरेंद्र पाठक यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ज्यात, भारतीय दंड संहिता 1860 अधिनियमचे कलम 34, 420, 465, 467, 468, 471 हा गुन्हा दाखल झाला आहे. तर, पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: