Beed Crime: धक्कादायक! बीडमध्ये गेल्या 5 महिन्यात बाललैंगिक अत्याचाराचे तब्बल 78 गुन्हे, 49% पीडिता अल्पवयीन
Beed:अल्पवयीन मुलींच्या बाबतीत असुरक्षिततेची भावना वाढत असल्याचे दिसते. पालक, शिक्षक, स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेसमोर या गुन्ह्यांवर आळा घालण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

Beed Crime: बीडमध्ये शाळा, क्लासेस आणि अगदी घरातही मुली असुरक्षित असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. प्रत्येक दोन दिवसांनी एक बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याची जिल्ह्यात नोंद होतेय. मागील पाच महिन्यांत बाललैंगिक अत्याचाराचे तब्बल 78 गुन्हे नोंद झालेत. यातील 42 गुन्हे अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराचे तर 36 गुन्हे विनयभंगाचे आहेत. धक्कादायक म्हणजे पाच महिन्यांत एकूण बलात्काराच्या घटनांमध्ये 49 टक्के पीडिता अल्पवयीन आहेत.
या प्रकरणांपैकी अनेक घटना परिचित व्यक्ती, शिक्षक किंवा शेजाऱ्यांकडून झाल्याचं पोलिस तपासातून समोर आलं आहे. विशेष म्हणजे नुकतीच "नीट" परीक्षेची तयारी करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा खाजगी क्लासमधील शिक्षक आणि संचालकाने लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडालीय. पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजला .
अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची 42 प्रकरणे
बीडमध्ये खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये "नीट" ची तयारी करणाऱ्या अल्पवयीन मुलीचा शिक्षक आणि क्लासेसच्या संचालकाने लैंगिक छळ केल्याचा प्रकार समोर आला. राज्यभर या प्रकाराने खळबळ उडाली. राजकीय वातावरणही तापलं. शिवाय पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजला. या प्रकरणामुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. या एका घटनेची चर्चा होत असली तरी चालू वर्षात जानेवारी ते मे 2025 या पाच महिन्यांच्या काळात जिल्ह्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार 78 गुन्हे नोंद करण्यात आलेत. यातील 42 प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाला आहे. उर्वरित 36 प्रकरणे ही विनयभंगाशी संबंधित आहेत. या आकडेवारीवरून बीड जिल्ह्यात बालकांच्या लैंगिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषतः अल्पवयीन मुलींच्या बाबतीत असुरक्षिततेची भावना वाढत असल्याचे दिसते. पालक, शिक्षक, स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेसमोर या गुन्ह्यांवर आळा घालण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
गतवर्षीच्या तुलनेत 23 गुन्ह्यांची वाढ
2024 मध्ये जानेवारी ते मे या कालावधीत जिल्ह्यात बलात्काराचे 65 गुन्हे नोंद झाले होते. यंदा यामध्ये 23 गुन्ह्यांची वाढ होऊन 85 गुन्हे झाले आहेत. तर विनयभंगाच्या 197 गुन्ह्यांची गतवर्षी नोंद होती, यामध्ये 12 टक्क्यांनी वाढ होऊन 209 गुन्हे नोंद झाले आहेत. या आकडेवारीवरून महिलांप्रमाणेच अल्पवयीन मुलींच्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांमध्येही चिंताजनक वाढ होत असल्याचे स्पष्ट होते.























