Crime News : आधी दारू पाजली, नंतर शीर धडावेगळे केले; खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले
Aurangabad Crime News : निव्वळ वादातून शिवीगाळ केल्याचा राग मनात ठेवून एकाची गळा चिरून हत्या करण्यात आली. आरोपीने मृताचे शीर धडावेगळे केले होते.
Aurangabad Crime News : दोन दिवसांपूर्वी पोलिसांना धडावेगळे शीर असलेल्या व्यक्तीच्या हत्येचा उलगडा करण्यास औरंगाबाद पोलिसांना यश आले आहे. गंगापूर तालुक्यातील मांजरी शिवारात दोन दिवसांपूर्वी निर्घुण हत्या झालेला मृतदेह आढळला होता. एका वादातून शिवीगाळ केल्याचा राग आल्याने गळा चिरून हत्या केली असल्याची कबुली आरोपीने दिली आहे. लक्ष्मण रायभान नाबदे ( वय ५५, रा. बोलेगाव, ह.मु. गंगापूर ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आरोपीने मृत्यू व्यक्तीला पार्टी देतो म्हणून बोलावून आधी दारू पाजली त्यानंतर गळा चिरून हत्या केली. या हत्येची घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती.
गंगापूर तालुक्यातील मांजरी शिवारात दोन दिवसांपूर्वी एका विहिरीत शीर नसलेला मृतदेह तरंगताना आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह बाहेर काढत ओळख पटवली असता. हा मृतदेह लक्ष्मण यांचा असल्याचं स्पष्ट झाले. शिर धडावेगळे असलेला मृतदेह असल्याने हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे पोलिसांनी त्यानुसार तपासाची चक्रे फिरवली. दरम्यान लक्ष्मण यांचा धडावेगळे केलेलं मुंडकं आणि कपडे कायगाव टोका येथे आढळून आले. त्यामुळे औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने पथक तयार केली. पोलिसांनी अवघ्या चार तासांत तीन आरोपींना ताब्यात घेतले.
आधी दारू पाजली त्यानंतर...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या तिघांनीच हा खून केला असल्याची कबुलीही आरोपींनी दिली आहे. या तीन आरोपींपैकी एकाने लक्ष्मण यांच्याकडून दोन लाख रुपये व्याजाने घेतले होते. मात्र वेळेवर पैसे दिले नाही म्हणून, लक्ष्मण सतत पैशांची मागणी करत होते. तर अनेकदा शिवीगाळ सुद्धा करायचे. म्हणून याचा राग आल्याने आणखी दोन साथीदाराच्या मदतीने लक्ष्मण यांचा आरोपीने खून करण्याचं ठरवलं. त्यानुसार लक्ष्मण यांना आधी पार्टी देतो म्हणून बोलविण्यात आले. मांजरी शिवारात एका ठिकाणी निवांत बसून त्यांना दारूही पाजली. त्यानंतर त्यांचा गळा चिरून हत्या केली.