बारामतीत 30 हजारांची लाच घेताना सहाय्यक फौजदाराला अटक, शहर पोलीस दलात खळबळ
बारामतीत 30 हजारांची लाच घेताना सहाय्यक फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या घटनेमुळे शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
बारामती : सावकारी प्रकरणात दाखल गुन्ह्यात मदतीसाठी 30 हजारांची लाच स्वीकारताना बारामती शहर पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार संदिपान माळी याला अटक करण्यात आली आहे. 40 हजारांपैकी 30 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. दरम्यान, या घटनेमुळे बारामती शहर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सावकारी कायद्यान्वये दाखल केलेल्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र पाठवताना आपल्या बाजूने पाठवण्यासाठी सहकार्य करावे यासाठी तक्रारदाराच्या पत्नीकडे संदिपान माळी याने 40 हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत संबंधित तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर सापळा रचला. त्यानुसार आज या प्रकरणात तडजोड करून 30 हजार रुपये स्वीकारताना संदिपान माळी याला रंगेहाथ पकडण्यात आले.
दरम्यान, या घटनेनंतर बारामतीत एकच चर्चा सुरू झाली आहे. काही महिन्यांपूर्वी येथील पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी ‘आमच्याकडे कोणत्याही कामासाठी पैसे घेतले जात नाहीत’ अशा आशयाचा फलक लावला होता. त्यातून त्यांनी पारदर्शक कारभार केला जात असल्याचे दर्शवले होते. त्यानंतर काही दिवसांतच हा फलक काढण्यात आला. आज झालेल्या कारवाईमुळे प्रत्यक्षात उलटेच घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या घटनेनंतर बारामती शहर पोलिस ठाण्यातील विविध प्रकरणांबाबत चर्चाही रंगू लागल्या आहेत. यापूर्वी बारामती शहर पोलिस ठाण्यातील वाहतूक पोलिसाचा पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. शहर पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल शंका उपस्थित होवू लागली आहे. त्यामुळे आता पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..