Amravati Crime News : एकाच कुटुंबातील सहा जणांना कारने उडवले, तिघांचा मृत्यू; पूर्ववैमनस्यातून घटना घडल्याचा आरोप
Amaravati News : पूर्ववैमनस्यातून एकाने शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील सहा जणांना कारने चिरडले. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे.
Amravati Crime News : अमरावती जिल्ह्यातील (Amaravati) दर्यापूर तालुक्यातील (Daryapur) नाचोना गावात (Nachona Village) धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबांतील सहा सदस्यांना चारचाकी वाहनाने उडवले. या घटनेत तीन जण जागीच ठार झाले असून तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना पूर्ववैमनस्यातून घडली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मारेकरी हा गावात अवैध दारू विक्रेता असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावात या घटनेनंतर तणावाचे वातावरण आहे. वाहन चालवणाऱ्या व्यक्तीने जुन्या वैमनस्यातून रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे म्हटले जात आहे. आरोपीने आपली कार पीडित कुटुंबाच्या घराजवळ नेली. त्यावेळी घराजवळ उभे असलेल्या कुटुंबातील काही सदस्यांच्या अंगावर जाणून बुजून कार नेली आणि त्यांना उडवले. आरोपी हा गावात बेकायदेशीरपणे दारु विक्री करत असून कायम नशेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून अन्य तीन गंभीर जखमी झाले आहेत. दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नाचोना या गावात हा भयंकर प्रकार घडला आहे. आरोपीचे नाव चंदन गुजर असल्याची माहिती आहे.
या घटनेत अनुसया शामराव अंभोरे (वय 67), शामराव लालूजी अंभोरे (वय 70) आणि अनारकली मोहन गुजर (वय 43) यांचा मृत्यू झाला. तर, जखमींमध्ये शारदा उमेश अंभोरे (वय 40) उमेश अंभोरे (वय 40)
किशोर शामराव अंभोरे (वय 38) यांचा समावेश आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.