Ambarnath Crime : 20 वर्षीय तरुणाची आधी तीक्ष्ण शस्त्रांनी हत्या, मग दगड बांधून मृतदेह तलावात फेकला
Ambarnath Crime : अंबरनाथ पश्चिमेच्या जावसई गावात 20 वर्षीय तरुणाची हत्या (Murder) करण्यात आली. त्यानंतर तरुणाच्या मृतदेहाला दगड बांधून तो आयप्पा मंदिराच्या तलावात फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Ambarnath Crime : मुंबईजवळच्या अंबरनाथमध्ये (Ambarnath) हत्येने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या जावसई गावात 20 वर्षीय तरुणाची हत्या (Murder) करण्यात आली. त्यानंतर तरुणाच्या मृतदेहाला दगड बांधून तो आयप्पा मंदिराच्या तलावात फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशाल राजभर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.
सुरुवातीला विशालच्या डोक्यावर आणि शरीराच्या इतर ठिकाणी तीक्ष्ण हत्यारांनी वार करुन त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह गोणीने बांधून आणि त्याच्या मानेला, पायाला मोठमोठाले दगड बांधून तो आयप्पा मंदिराच्या तलावात फेकून देण्यात आला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने हे कृत्य केलं असावं, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
दरम्यान दगडाने बांधल्याने हा मृतदेह तळाशी गेला होता. अंबरनाथ पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलाच्या मदतीने विशालचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. सध्या अंबरनाथ पोलीस ठाण्यात विशालच्या हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे. ही हत्या कोणत्या कारणामुळे झाली हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र अंबरनाथ शहरात आठवडाभरात दोन हत्या झाल्याने शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे असंच म्हणावं लागेल.
अंबरनाथमध्ये आठवडाभरात दोन हत्या
अंबरनाथमध्ये आठवडाभरात दोन हत्या झाल्या. मागील आठवड्यात शुक्रवारी (29 जुलै) दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबाराचा थरारक पाहायला मिळाला. शिवाजीनगर परिसरात दुपारच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी दोन तरुणांवर आधी लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला, त्यानंतर त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात तुषार गुंजाळ नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला तर गणेश गुंजाळ या तरुणाला गंभीर दुखापत झाली. व्यावसायिक वादातून ही हत्या झाल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली. हल्लेखोरांनी तुषारवर गोळीबार केल्यानंतर गणेशवरही गोळी झाडण्यासाठी पिस्तुल रोखली होती. मात्र पिस्तुल अचानक लॉक झाली आणि त्यामुळे गणेशचा जीव वाचला. दरम्यान आता याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला आहे. ठाणे कल्याण, उल्हासनगर गुन्हे शाखा या प्रकरणाचा समांतर तपास करत आहे.