Akola : अकोला पोलिसांचा अमानुष चेहरा समोर, पार्श्वभागात दांडा टाकून मारहाण, अकोटमध्ये पोलिसांच्या मारहाणीत संशयित आरोपीचा मृत्यू?
Akola Crime : तब्बल दोन महिने अकोला पोलिसांनी हे प्रकरण दडवून ठेवल्याचं समोर आलंय. संशयित आरोपीस क्रूरपणे मारणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह एका पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे.
अकोला : एका प्रकरणात अकोला पोलिसांच्या वागणुकीनं अक्षरश: क्रूरतेचा कळस गाठला आहे. 'सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय'चं ब्रिद घेतलेल्या पोलीस दलातील अकोट पोलिसांतील अधिकारी असलेल्या राजेश जवरे या पोलीस उपनिरीक्षक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 'खलपुरूषां'नाही लाजवणारं काम केलं आहे. पोलिसांच्या मारहाणीमुळे एका संशयिताचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला असून हे प्रकरण पोलिसांनी दोन महिन्यांपासून दडपून ठेवलं आहे.
दोन महिन्यांपूर्वी एका गुन्ह्यातील आरोपाखाली संशयित म्हणून अकोट शहर पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं. यादरम्यान पोलिसांकडून त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. अकोट पोलिसांनी त्याच्या पार्श्वभागात दांडा टाकून त्याला क्रूर मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या अंगावर गंभीर जखमा झाल्यात. यासोबतच त्याच्या छातीची हाडं तुटलीत.
त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याला एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा दुसऱ्याच दिवशी दुर्दैवी मृत्यू झाला. 'गोवर्धन हरमकार' असं या मृत व्यक्तीचे नाव आहे. तो अकोट तालूक्यातील सुकळी गावाचा रहिवाशी आहे. तो अतिशय गरीब कुटुंबातील आहे.
दोन महिने प्रकरण दडपून ठेवलं
विशेष म्हणजे एवढ्या गंभीर प्रकरणात अकोला पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती. जानेवारी महिन्यात घडलेलं हे प्रकरण तब्बल दोन महिने अकोला पोलिसांनी दाबून ठेवलं. मात्र मृताच्या नातेवाईकांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे धाव घेतली. यानंतर आता या प्रकरणात एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणाची तीव्रता लक्षात घेता सद्यस्थितीत या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे आणि एका पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
15 जानेवारीला नेमकं काय झालं होतं?
मृत गोवर्धन यांचे काका सुखदेव हरमकार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एका गुह्याच्या आरोपाखाली अकोट शहर पोलिसांतील पीएसआय राजेश जवरे' आणि इतर तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी 15 जानेवारी रोजी पुतण्या गोवर्धन याला ताब्यात घेतलं. त्यानंतर 16 जानेवारीला त्याला त्याच्या सुकळी या गावात आणत घरझड़ती घेतली. त्यावेळी पोलिसांच्या हाती काहीच लागलं नव्हतं.
पुढे पोलिसांनी गोवर्धनसह त्याचे सध्या तक्रारदार असलेले त्याचे काका सुखदेव यांनाही ताब्यात घेतलं. 16 जानेवारीला रात्री आठ ते नऊ वाजतादरम्यान दोघांनाही पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. इथं दोघांनाही अमानुषपणे मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सुखदेव हरमकार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यानंतरही पोलिसांकडून मृत गोवर्धनला अमानुषपणे मारहाण सुरूच होती. एवढ्यावरच न थांबता पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे आणि त्यांच्या साथीदारांनी मृतक गोवर्धनच्या पार्श्वभागात दांडा टाकून क्रूरतेचा कळस गाठला.
सरकारी दवाखान्यात न नेता खाजगी दवाखान्यात उपचार
या गंभीर मारहाणीत गोवर्धनच्या छातीची हाडं तुटली. गंभीर अवस्थेत असलेल्या गोवर्धनला एका बाहेरील व्यक्तीच्या मदतीनं पोलिसांनी अकोटमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं. त्या दवाखान्यानं उपचारास नकार देत त्याला अकोट ग्रामीण रुग्णालयात पाठवायचा सल्ला दिला. अकोट ग्रामीण रुग्णालयाने त्याची गंभीर परिस्थिती पाहून पुढील उपचारासाठी त्याला अकोला जिल्हा रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र जवरेच्या सांगण्यावरून त्याला अकोला जिल्हा रूग्णालयात भरती न करता पोलिस कारवाईच्या भितीने अकोल्यातील एका खाजगी रूग्णालयात त्याला भरती करण्यात आलं.
मारहाणीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 जानेवारीला उपचार दरम्यान मृत्यू झाला. गोवर्धनच्या प्राथमिक एक्स-रे आणि वैद्यकीय कागदपत्रांनुसार त्याच्या छातीची हाडं तुटली होती असा आरोपही मृत गोवर्धनच्या नातेवाईकांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
प्रकरण दाबण्यासाठी अकोल्यातच केलेत अंत्यसंस्कार
गोवर्धनचं निधन झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली. त्याचे कुटुंबीय अकोल्यात आल्यानंतर त्यांनी मृतदेह गावी नेण्याचा आग्रह केला. मात्र त्यांना धमकावत त्यांच्याकडून आमची परिस्थिती नसल्यामुळे आम्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करू शकत नसल्याचं जबरदस्तीने लिहून घेण्यात आलं. त्यानंतर अकोल्यात गरीब आणि अनोळखी मृतदेहावर अंत्यसंस्कार करीत असलेल्या संस्थेशी संपर्क साधून अकोल्यातील मोहता मिल स्मशानभूमीत मृतदेहाला अग्नी देण्यात आला. गावात अंत्यसंस्कार झाले असते तर प्रकाराचा बोभाटा झाला असता म्हणून अकोल्यात घाईघाईत गोवर्धनवर अंत्यसंस्कार करवून घेतल्याचं बोललं जात आहे.
मृतकाच्या कुटुंबीयावर पोलिसांचा दबाव
या संपूर्ण प्रकरणानंतर गोवर्धनचं कुटूंब प्रचंड दहशतीत होतं. मात्र, प्रकरणाच्या तब्बल दोन महिन्यांनंतर त्यांनी या प्रकरणाची तक्रार करण्याचा निर्णय घेतली. दरम्यान तक्रार मागे घेण्यासाठी काही बाहेरील व्यक्तीमार्फत आपल्याला धमकावत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. गोवर्धनचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे अंत्यसंस्कार अकोल्यातच करण्यासाठी आकाश चावरे या व्यक्तीमार्फत त्याच्या कुटूंबियांना धमकविण्यात आलं. हा आकाश चावरे कोण? आणि त्याचा बोलविता धनी कोण? हेही पोलीस तपासात समोर येणं गरजेचं. विशेष म्हणजे या प्रकरणात अकोट शहर पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारची नोंद करण्यात आली नाही. गोवर्धनला ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर करण गरजेचं होतं. पण झालं नाही असेही तक्रारीत म्हटलं आहे.
शवविच्छेदनाच्या वैद्यकीय अहवालात धक्कादायक खुलासे
गोवर्धन याच्या मृत्यूप्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसात मर्ग दाखल करण्यात आला असून वैद्यकीय अहवालात मृत्यूचं कारण आतापर्यंत समजू शकल नाही. मात्र प्राथमिक अहवालात गोवर्धन याच्या अंगावर मोठ्या प्रमाणात जखमा आढळून आल्या. अशी माहिती आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांनी दिली आहे. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी अद्याप याप्रकरणी गंभीर भूमिका घेतली नाही. अखेर कुटुंबियांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे धाव घेतली. आता या प्रकरणात चौकशी समिती गठित झाली आणि पुढील चौकशी पोलीस करताहेत.
वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरेसह एका पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन
या प्रकरणात आरोप असलेला पोलीस उपनिरिक्षक राजेश जवरे' आणि पोलीस कर्मचारी 'सोळंके' या दोघांचं निलंबन करण्यात आलं आहे. दरम्यान वैद्यकीय अहवालानूसार मृतक गोवर्धन याच्या अंगावर जखमा असून मारहाणीमूळे त्याचा मृत्यु झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळ आपल्या गैरवर्तनाच्या संशयावरुन दोघांनाही निलंबित करण्यात येत, असे आदेशात नमुद आहे. पोलिस अधिक्षक बच्चनसिंग यांनी हे आदेश काढले. विशेष म्हणजे अकोटचे आयपीएस अधिकारी अनमोल मित्तल यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून एक अहवाल तयार केला आहे. आणि तो अहवाल वरिष्ठांना पाठविला, अशी माहिती त्यांनी दिली आहे. परंतु तपासात नेमकं काय आहे, यावर त्यांनी बोलायला टाळलं.
अकोला पोलिसांना 'एबीपी माझा'चे सवाल
मृत गोवर्धनला कोणत्या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं? नेमकं पोलिस ठाण्यात काय घडलं? वैद्यकीय अहवालात नेमकं काय समोर येणार?, पोलिसांकडून माहिती द्यायला टाळाटाळ का केली जातंय?, कुटुंबियांना धमक्या देणारे 'ते' व्यक्ती कोण? कुटुंबीयांचे आरोप कितपत सत्य? यासह अन्य प्रश्नांची उत्तरं अकोला पोलिसांना शोधावी लागणार आहेत.
राजेश जवरेंवर खुनाचा गुन्हा दाखल होणार का?, कुटुंबीय आणि गावकऱ्यांचा सवाल
या संपूर्ण प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक आणि त्याचे सहकारी असलेल्या काही लोकांवर संशयाची सुई फिरते आहे. मृतकाच्या पार्श्वभागात दांडू घालणे, मारहाणीत त्याच्या छातीची हाडं मोडणं इतका अमानुषपणा जवरेकडून होत असताना त्याचे वरिष्ठ असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक इतके अनभिज्ञ कसे? प्रकरण दाबण्यासाठी नंतर दिल्या गेलेल्या धमक्या, आकाश चावरे याने कुणाच्या सांगण्यावरून त्याच्या कुटुंबीयांना धमक्या दिल्यात? गावात जावून मृतकाच्या कुटुंबीयांना धमक्या देणारे कोण? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं पोलिसांना शोधावी लागणार आहे? यासोबतच जवरेचे या काळातील कॉल डिटेल्स शोधले तर अनेक प्रश्नांची उकल होऊ शकेल. या संपूर्ण प्रकरणात जवरे आणि इतर दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला बडतर्फ करण्याची मागणी मृतकाचे नातेवाईक आणि गावकरी करीत आहेत.
विधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्याकडून प्रकरणाची दखल
दरम्यान, या गंभीर प्रकरणाची दखल विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी घेतली आहे. आज त्यांनी यासंदर्भात अमरावती परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांच्याशी चर्चा करीत प्रकरणाची माहिती घेतली. यात दोषींवर कठोर कारवाईचे आदेश त्यांनी पोलिसांना दिलेत.
ही बातमी वाचा: