Akola News : कुठे शेतातल्या साहित्याची नासधूस, तर कुठे उभ्या पिकाला लावली आग; अकोल्यातल्या शेतकर्यांमध्ये संतापाची लाट
Akola News : अकोला जिल्ह्यात काही अज्ञातांनी शेतात ठेवलेल्या साहित्याची नासधूस करत मोठे नुकसान केले आहे. तर एक ठिकाणी शेतात कापणी करुन ठेवलेल्या ज्वारीच्या पीकाला आग लावल्याची घटना घडली आहे.
Akola News अकोला : सततच्या अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपीटीमुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी आधीच मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशातच अकोला जिल्ह्यात (Akola News) काही अज्ञातांकडून शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर घालणारी बातमी समोर आली आहे. यात काही अज्ञातांनी शेतात ठेवलेल्या साहित्याची नासधूस करत मोठे नुकसान केले आहे. तर एक ठिकाणी शेतात कापणी करुन ठेवलेल्या ज्वारीच्या पीकाला आग लावल्याची घटना घडली आहे. मात्र, असे प्रकार करण्यामागील नेमकं कोण आणि त्याचा उद्देश नेमका काय, असा प्रश्न या निमित्याने उपस्थित केला जात आहे. तर, दुसरीकडे या प्रकरणामुळे शेतकर्यांमध्ये संतापाची लाट उसळल्याचे बघायला मिळत आहे.
कापणी करुन ठेवलेल्या ज्वारीच्या पीकाला लावली आग
अकोला जिल्ह्यातील पणज येथे कापणी करुन ठेवलेल्या ज्वारीच्या पीकाला आग लावण्यात आल्याची घटना घडलीय. या आगीत शेतकऱ्याचं ज्वारी पिक पूर्णपणे जळून ख़ाक झालंय. अकोट तालुक्यातील पणजच्या नर्सिंगपूर शेत शिवारात काल सायंकाळच्या सुमारास ही आग लागलीय. अल्पभूधारक शेतकरी रवींद्र नवले आणि दिलीप नवले यांचे हे शेत आहे. शेतात कापणी केलेल्या ज्वारीच्या पीकाच्या गंजिला अज्ञात व्यक्तीनं आग लावली आहे.
या आगीत संपूर्ण पीक जळाले आहे. हवेचा वेग जास्त प्रमाणात असल्याने कापणी करुन ठेवलेलं ज्वारीचं पीक कणसासहीत जळाल्याने शेतकऱ्याचे मोठं नुकसान झाले आहे. यात 1 ते दीड लाखांपर्यत ज्वारी आणि कडबा आगीमध्ये जाळाला असल्याचा अंदाज आहे. या नुकसानीचा संबंधीत विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी नवले यांनी केली आहे. मात्र हे कृत्य कोणी केलं आणि ते करण्यामागे नेमकं कारण काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
दहा शेतकऱ्यांच्या शेतातील साहित्याची तोडफोड
असाच एक संतापजनक प्रकार अकोल्यातल्या तेल्हारा तालुक्यातील कोठा शेतशिवारात घडला आहे. यात शेतकऱ्याच्या शेतमालासह शेती उपयोगी साहित्यांना काही अज्ञातांनी आग लावलीये, या आगीत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे. कोठा शेतशिवार हा बागायाती परिसर असल्याने बारमाही इथे सिंचन राहते. त्यामुळ शेतातच पाईप, स्प्रींकलर आणि इतर साहित्य कायम असतं. मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तीनं तब्बल दहा शेतकऱ्यांच्या शेतातील पाईप, स्प्रींकलर, स्टार्टरची तोडफोड केलीय.
गोदामात ठेवलेला कापूसही पेटवला
यात 290 पाईप कोयत्यानं फोडल्याचे दिसून आले. तर वैभव अहेरकर यांच्या शेतातील गोदामात ठेवलेला कापूस सुध्दा पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. तर काही पिकांना देखील आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या प्रकरणात तेल्हारा पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू केला आहे. तर या प्रकरणाची तात्काळ चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या