नराधम शिक्षकाचा तिसरीतल्या विद्यार्थीवर अत्याचार, आई-वडिलांवर दबाव; अखेर 5 जणांविरुद्ध गुन्हा
मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यानुसार, 1 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पीडित मुलीवर शाळेच्या परिसरातच जबरदस्ती करण्यात आल्याचा आरोप आहे.

अहिल्यानगर : जिल्ह्याच्या पाथर्डी (Ahilyanagar) तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील (School) तिसरीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शाळेतीलच शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात 5 जणांविरोधात पोक्सो आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. पीडीत मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आज हा गुन्हा दाखल केला असून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, मुख्य आरोपी शिक्षक हा पसार झाला आहे, पोलिसांची पथके शिक्षकांच्या शोधासाठी पाठविण्यात आल्याची माहिती अहिल्यानगरचे पोलीस (police) अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यानुसार, 1 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पीडित मुलीवर शाळेच्या परिसरातच जबरदस्ती करण्यात आल्याचा आरोप आहे. संबंधित मुलीला दुपारच्या जेवणाच्या सुट्टीच्यावेळी संजय फुंदे हा नराधम शिक्षक वर्गात बोलावून घेत, तसेच तिच्यावर अत्याचार करत होता. या घडलेल्या प्रकारासंदर्भात मुलीने आपल्या आईला कल्पना दिली, त्यानंतर तिचे आई आणि वडील हे जाब विचारण्यासाठी शाळेत गेले असता त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. विशेष म्हणजे गावात कामानिमित्त आलेले संबंधित कुटुंबीय हे परप्रांतीय असल्याने स्थानिकांकडून हे प्रकरण मिटवण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे. याप्रकरणी संजय उत्तम फुंदे, आदिनाथ रामनाथ दराडे, राजेंद्र सूर्यभान दराडे, मुनव्वर खान सर्वरखान पठाण, उमर नियाज पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत स्थानिक पोलिसांना विचारले असता त्यांच्याकडून माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार असल्याची माहिती असून इतर चार जणांना ताब्यात घेण्यात आल आहे.
पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने आईला घडलेली घटना सांगितली, मात्र गावातील काही प्रतिष्ठितांकडून पीडित कुटुंबीयांवर दबाव टाकला जात होता. त्यामध्ये, ग्रामपंचायत सदस्यासह इतरही 4 जणांचा समावेश होता. अखेर, पीडित महिलेने मुलीच्या वडिलांना सोबत घेऊन याबाबत पोलिसात तक्रार दिल्यानंतर आरोपींविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 1 ऑगस्ट रोजी घडली होती, सध्या नराधम शिक्षक फरार असून त्याचा शोधासाठी पथके रवाना झाल्याचेही सोमनाथ घार्गे यांनी सांगितले. तर, इतर चौघांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा
..तर फाशी द्या, मग जावई का असेना; रुपालीताई चेकाळून बोलल्या, एकनाथ खडसेंचा पलटवार























