Why Share Market Fall: दीड लाख कोटींचा चुराडा...तेजीत असणारा शेअर बाजार आज का आपटला? ही आहेत कारणं
Why Market Fall: आज बाजारात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे दीड लाख कोटी बुडाले. शेअर बाजारात आज झालेल्या घसरणीची कारणे काय?
Why Share Market Fall Today: सलग 6 दिवस बाजारात तेजी दिसून येत होती. मात्र, आज झालेल्या व्यवहारात शेअर बाजारात घसरण दिसून आली. शेअर बाजारातील काही मोठ्या कंपन्यांनी जून तिमाहीचे निकाल जाहीर केले. मात्र, या मोठ्या कंपन्यांची कामगिरी फारशी चांगली नसल्याने बाजारात त्याचा नकारात्मक परिणाम दिसून आला.
कमकुवत जागतिक संकेत आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांची विक्री यामुळेही बाजारातील व्यवहारांवर परिणाम केलेा. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 हे दोन्ही इंट्रा-डेमध्ये 1.5 टक्क्यांहून अधिक घसरले. PSU बँक, मीडिया आणि रियल्टी यासह काही क्षेत्रातील समभाग वगळता इतरांवर विक्रीचा दबाव आहे.
इन्फोसिसकडून जोरदार झटका
इन्फोसिसने आज बाजाराला सर्वात झटका दिला. आयटी क्षेत्रातील या दिग्गज कंपनीसाठी जून तिमाहीचा निकाल फारसा चांगला दिसून आला नाही. कंपनीने या आर्थिक वर्षासाठी रेव्हेन्यू गाइडन्स कमी होण्याचे संकेत दिले. यामुळे इन्फोसिसचा शेअर दर जवळपास 10 टक्क्यांनी घसरला. इन्फोसिसमधील घसरणीचा परिणाम शेअर बाजारावरही झाला.
दीर्घकालीन गुंतवणूकदार खरेदी करून या घसरणीचा फायदा घेऊ शकतात. इन्फोसिस 18 ते 24 महिन्यांत नवीन उंची गाठू शकेल, असा अंदाज बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी 1 डिसेंबर 2022 रोजी इन्फोसिसचा शेअर दर 1672.45 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर होता.
रिलायन्स-एचयूएलची घसरण
सेन्सेक्स आणि निफ्टी 50 वर रिलायन्सचा मोठा वाटा आहे. रिलायन्सने आपले वित्तीय सेवा युनिट वेगळे केले आहे, त्यामुळे आता रिलायन्सच्या शेअर दरात तीन टक्क्यांची घसरण झाली. याशिवाय, आज हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे (HUL) शेअर्स जून तिमाहीच्या निकालांवरही घसरले. जून तिमाहीत त्याच्या विक्रीचे प्रमाण केवळ 3 टक्क्यांनी वाढले. त्याचा परिणाम शेअर दरावर दिसून आला. एचयूएलचे समभाग तीन टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.
जागतिक शेअर बाजारात घसरण
या वर्षी 40 टक्क्यांच्या तेजीनंतर 20 जुलै रोजी, नॅस्डॅकने मार्चनंतरची सर्वात तीव्र घसरण दिसून आली. टेस्ला आणि नेटफ्लिक्ससारख्या दिग्गज टेक कंपन्यांच्या तिमाही निकालानंतर शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने नॅस्डॅकला धक्का बसला. आता तो जगभरात घसरणीचा कल दर्शवत आहे. जपान शेअर बाजाराचा निर्देशांक निक्की 0.6 टक्क्यांनी घसरला. चीनच्या ब्लू चिप कंपन्यांच्या शेअर दरात 0.2 टक्क्यांनी घसरण झाली. हाँगकाँगचा निर्देशांक हँग सांग मात्र 0.4 टक्क्यांनी वधारला.
नफावसुलीचा जोर
बाजारात आज झालेल्या घसरणीमुळे अनेकांना धक्का बसला. मात्र, शेअर बाजार अभ्यासकांच्या मते निफ्टी निर्देशांकात व्यवहाराच्या मागील 15 दिवसात 1100 अंकांची तेजी दिसून आली. त्यामुळे आज नफावसुलीचा जोर दिसला. त्यामुळे ही घसरण अपेक्षेनुसार होती असेही विश्लेषकांनी म्हटले.
(Disclaimer: ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. गुंतवणुकीआधी आर्थिक सल्लागारांचा सल्ला आवश्यक घ्यावा. शेअर बाजारातील तुमच्या आर्थिक नुकसानीसाठी 'एबीपी माझा' जबाबदार राहणार नाही.)