संरक्षण क्षेत्रात भारताचा प्लॅन काय? किती उत्पादन किती निर्यात? संरक्षण मंत्र्यांनी दिली सविस्तर माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘आत्मनिर्भर भारत’चे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने देश लक्षणीय प्रगती करत आहे असं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं.
Defense Minister Rajnath Singh : मजबूत अर्थव्यवस्थेसाठी प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भरता ही पहिली अट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘आत्मनिर्भर भारत’चे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने देश लक्षणीय प्रगती करत आहे असं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं आहे. 30 ऑगस्ट 2024 रोजी केरळमधील थिरुवनंतपुरम येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते . संरक्षण संशोधन आणि विकास तसेच नवोन्मेषासाठी उत्पादनाचा एक मजबूत पाया आणि एक परिसंस्था निर्माण करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. 2029 पर्यंत 3 लाख कोटी रुपये मूल्याचे संरक्षण उत्पादन आणि 50000 कोटी रुपयांच्या संरक्षण निर्यातीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
65 टक्के उपकरणे भारतीय भूमीवर उत्पादित होतात
राजनाथ सिंह यांनी नुकतीच अमेरिकेला भेट दिल्याचा उल्लेख करत सांगितले की अमेरिकेतील संरक्षण कंपन्यांबरोबर फलदायी चर्चा झाली आहे. त्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात सहभागी होण्यास उत्सुक आहेत. एक काळ होता जेव्हा देश संरक्षण विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी इतर देशांवर अवलंबून होता आणि सुमारे 65-70 टक्के संरक्षण उपकरणे आयात केली जात होती, यावर राजनाथ सिंह यांनी भर दिला. मात्र आज हे चित्र बदलले आहे, असे सांगून ते म्हणाले की, 65 टक्के उपकरणे भारतीय भूमीवर उत्पादित केली जात आहेत आणि केवळ 35 टक्के आयात केली जात आहे.
वार्षिक संरक्षण उत्पादन 1.27 लाख कोटी रुपयांच्या पुढे
वार्षिक संरक्षण उत्पादन 1.27 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. चालू आर्थिक वर्षात ते 1.75 लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. संरक्षण मंत्रालय 2029 पर्यंत तीन लाख कोटी रुपयांचे संरक्षण उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आज आपण भारतात बनवलेल्या संरक्षण उपकरणांचीही निर्यात करत आहोत. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारताच्या संरक्षण निर्यातीने 21,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. 2029 पर्यंत संरक्षण निर्यात 50,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे आमचे लक्ष्य आहे,” असे राजनाथ सिंह म्हणाले.
सुशासनाला सरकारचे प्राधान्य
भारत आज ग्लोबल साउथचा सर्वात मोठा आवाज बनला आहे. प्रत्येक देश महत्त्वाच्या मुद्द्यांवर भारताचे मत विचारात घेतो आणि ते ऐकतो. विकासाचा जलद वेग असूनही, भारतात महागाई नियंत्रणात असल्याचे राजनाथ सिंह यांनी निदर्शनास आणून दिले . सुशासनाला सरकारचे प्राधान्य असल्याचे सांगत संरक्षण मंत्री म्हणाले की सुशासन सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक धोरण आणि कार्यक्रम स्थैर्य , सातत्य आणि अखंडता या तत्त्वांवर आधारित आहे. महिलांचे आरोग्य, सुरक्षा आणि कल्याण याला सरकारचे प्राधान्य असल्याचे संरक्षण मंत्री म्हणाले. कायद्याची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे असे ते म्हणाले.
महिलांच्या लष्करातील प्रवेश मार्गातील अनेक अडथळे दूर
सशस्त्र दलांमध्ये महिलांची वाढती भूमिका अधोरेखित करत राजनाथ सिंह म्हणाले की, महिलांच्या लष्करातील प्रवेश मार्गातील अनेक अडथळे दूर करण्यात आले आहेत.