लग्न, कर्जफेड ते वैद्यकीय उपचार, PF खात्यातील पैसे नेमके कधी काढता येतात? जाणून घ्या नियम आणि अटी!
पीएफ खात्यातील रक्कम कधी काढता येते? त्यासाठीचे नियम काय आहेत, असे अनेकवेळा विचारले जाते. हीच सर्व माहिती जाणून घेऊ या...
मुंबई : निवृत्तीनंतर आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी कर्मचारी आपल्या ईपीएफओ (EPFO) खात्यात दरमहा काही रक्कम जमा करत असतात. या रकमेवर सरकार व्याज देते. निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना ही रक्कम सवेतन दिली जाते. मात्र नोकरीवर असताना कठीण काळात पीएफ खात्यातील रक्कम काढता येते. वेगवेगळ्या कारणांसाठी ही रक्कम पीएफ खातेधारकांना काढता येते. मात्र त्यासाठी काही नियम आहेत. हे नियम काय आहेत? कोणत्या स्थितीत पीएफ खात्यातील रक्कम काढता येते? हे जाणून घेऊ या..
पीएफ खात्यात जमा करण्यात येणारी रक्कम निवृत्तीनंतर वापरावी, असा सामान्य नियम आहे. मात्र नोकरीवर असतानाही अनेक संकटं येऊ शकतात. अशा परिस्थिती अतिरिक्त पैशांची गरज भासू शकते. याच बाबीचा विचार करून ईपीएफओने पीएफ खात्यातील पैसे निवृत्तीआधीही वापरण्याची सोय केली आहे. मात्र वेगवेगळ्या स्थितीत पीएफ खात्यातून रक्कम काढण्यासंबंधी ईपीएफओने काही नियम तयार केले आहेत. ते खालीलप्रमाणे
या स्थितीत पीएफ खात्यातील पैसे काढता येतात!
वैद्यकीय उपचार- पीएफ खात्यात तुम्ही जमा केलेली रक्कम ही वैद्यकीय उपचारासाठी काढता येते. पती, पत्नी, आई, वडील, मुलांच्या उपचारासाठी हे पैसे काढता येतात. यासाठी कर्मचाऱ्याने अमुक वर्षे सेवा दिलेली पाहिजे, अशी कोणतीही अट नाही. वैद्यकीय उपचारासाठी कर्मचाऱ्याच्या बेसिक सॅलरीच्या सहा पट किंवा कर्मचाऱ्याने जमा केलेला निधी (व्याजासह) ईपीएफओ खात्यातून काढता येतो. यातील जो निधी कमी असेल तो पीएफ खात्यातून काढता येतो.
लग्न : घरात लग्नकार्य असेल तर पीएफ खात्यात जमा करण्यात आलेला निधी काढता येतो. मात्र हा निधी काढण्यासाठी कर्मचाऱ्याने कमीत कमी सात वर्षे नोकरी केलेली असायला हवी. लग्नकार्यासाठी जमा केलेल्या एकूण निधीच्या 50 टक्के निधी (व्यााजसह) हा कर्मचाऱ्याला काढता येते. स्वत:, भाऊ, बहीण तसेच मुलांच्या लग्नासाठी हा निधी काढता येतोच.
शिक्षण : शिक्षणासाठीदेखील पीएफ खात्यातील निधी काढता येतो. त्यासाठी कर्मचाऱ्याने कमीत कमी सात वर्षे काम केलेले असायला हवे. एकूण जमा करण्यात आलेल्या रकमेच्या 50 टक्के निधी अशा स्थितीत काढता येतो. स्वत:च्या तसेच मुलांच्या उच्च शिक्षणासाठी हे पैसे काढता येतात.
घर, जागा खरेदी, घर बांधणी : घर खरेदी करायचे असल्यास, घर बांधण्यासासाठी जागा घ्यायची असल्यास पीएफ खात्यातून पैसे काढता येतात. जमीन खरेदी करायची असल्यास प्रतिमहिना बेसिक सॅलरीच्या 24 पट तसेच डेअरनेस अलाउन्स काढता येतो. घर खरेदी करायचे असल्यास प्रतिमाहा बेसिक सॅलरीच्या 36 टक्के एवढा निधी काढता येतो. मात्र घर, जागा ही पीएफ खातेधारकाच्या किंवा पती-पत्नीच्या नावे असायला हवी. तसेच कर्मचाऱ्याने कमीत कमी पाच वर्षे सेवा दिलेली असायला हवी.
गृहकर्जाची परतफेड : कर्मचाऱ्याने घेतलेल्या गृहकर्जाच्या परतफेडीसाठीदेखील पीएफ खात्यातील रक्कम काढता येते. त्यासाठी कर्मचाऱ्याने 10 वर्षे नोकरी केलेली असायला हवी. अशा स्थितीत डेअरनेस अलाऊन्ससह प्रतिमाहा बेसिक सॅलरीच्या 36 टक्के निधी काढता येतो.
घराची डागडुजी : कर्मचाऱ्याने पाच वर्षे नोकरी केलेली असेल तर त्याला घराच्या डागडुजीसाठी पीएफ खात्यातून रक्कम काढता येते. डेअरनेस अलाउन्ससह पगाराच्या 12 पट रक्कम काढता येते.
कर्मचाऱ्याने वयाची 58 वर्षे पूर्ण केलेली असतील तर एकूण जमा रकमेच्या 90 टक्के रक्कम तो काढू शकतो.
हेही वाचा :
दुबई, लंडनमध्ये आलिशान घर, तब्बल 1400 कोटींची संपत्ती, भाजपच्या महिला उमेदवाराची देशभरात चर्चा!
सोन्याचे दागिने करून गुंतवणूक करताय? थांबा, 'डिजिटल सोनं' आहे चांगला पर्याय; होणार 'हे' फायदे!
अब्जाधीश एलॉन मस्क भारतात येणार, 'हे' शेअर्स रॉकेटप्रमाणे भरारी घेणार?