सोन्याचे दागिने करून गुंतवणूक करताय? थांबा, 'डिजिटल सोनं' आहे चांगला पर्याय; होणार 'हे' फायदे!
सोन्याचा भाव सध्या चांगलाच वाढलेला आहे. या निमित्ताने आता डिजिटल गोल्डची सगळीकडे चर्चा होत आहे. गुंतवणूक कोणत्या मार्गाने करावी, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
मुंबई : सध्या सोनं चांगलाच भाव खातंय. या सोन्याचा भाव आगामी काळात एक लाख रुपये तोळा होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोन्याच्या रुपात गुंतवणूक करणारे सध्या चांगलेच खुश आहेत. तर लग्नसराईत सोन्याचे दागिने करण्याची इच्छा असणाऱ्यांना मात्र घाम फुटला आहे. दरम्यान, सोनं महागलेलं असतानाच आता सोन्यात गुंतवणूक केल्यास भविष्यात चांगला परतावा मिळू शकतो, हे लोकांना पटायला लागलं आहे. मात्र आता प्रत्यक्ष सोनं आणि सॉवरेन गोल्ड बॉण्ड (डिजिटल गोल्ड) यापैकी कोणता पर्याय निवडावा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दोन्हीपैकी नेमकं फायद्याचं काय आहे? असं विचारलं जात आहे.
सॉवरेन गोल्ड बॉण्ड म्हणजे काय?
सॉवरेन गोल्ड बॉण्ड ही सरकारची एक योजना आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही डिजिटल स्वरुपात सोन्याची खरेदी करू शकतात. तुम्ही पैसे दिल्यानंतर तुम्हाला सरकारकडून कागदपत्रांच्या रुपात सोनं दिलं जातं. यालाच डिजिटल गोल्ड किंवा सॉवरेन गोल्ड बॉण्ड असे म्हटले जाते. प्रत्यक्ष सोन्याचा धातू खरेदी करण्यापेक्षा अशा प्रकारे डिजिटल रुपात खरेदी केलेलं सोनं हे तुलनेनं सुरक्षित मानलं जातं.
डिजिटल सोन्याचा नेमका फायदा काय?
आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सॉवरेन गोल्ड बॉण्डच्या रुपात गुंतवणूक करणे हे अनेक अर्थांनी फायद्याचे ठरू शकते. डिजिटल गोल्डच्या रुपात गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. विशेष म्हणजे हा व्यवहार पूर्णपणे सुरक्षित असतो. सॉवरेन गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक केल्यास सरकार तुम्हाला 2.5 टक्के व्याज देते. तुम्हाला एका आर्थिक वर्षात एका ग्रॅमपासून ते एका किलोपर्यंत गोल्ड बॉण्ड खरेदी करता येतो. एकदा सॉवरेन गोल्ड बॉण्ड खरेदी केल्यावर तो आठ वर्षांसाठी ठेवावा लागतो.
धातूरुपातील सोने की डिजिटल सोने?
आठ वर्षांचा कालावधी झाल्यानंतर तुम्हाला त्या वेळच्या सोन्याच्या भावाप्रमाणे तुम्ही गुंतवणूक केलेले मूल्य परत मिळते. तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर 2.5 टक्के व्यजही मिळते. विशेष म्हणजे तुम्हाला झालेल्या फायद्यावर कर आकारला जात नाही. तुम्ही सॉवरेन गोल्ड बॉण्डच्या रुपात गुंतवणूक केल्यास इतरही फायदे आहेत. तुम्ही धातूरुपात सोने खरेदी करत असाल तर तुम्हाला घडणावळीचे पैसे द्यावे लागतात. ते सोने जपून ठेवण्याचा धोका असतो. त्यानंतर सोने शुद्ध आहे की अशुद्ध अशीही धाकधूक तुमच्या मनात असते. मात्र सॉवरेन गोल्ड बॉण्डच्या रुपात सुने खरेदी केल्यास सोन्याची काळजी घेण्याची गरज नसते. सोन्याच्या शुद्धतेचा, अशुद्धतेचाही प्रश्न येत नाही. विशेष म्हणजे त्यावर तुम्हाला जीएसटीही द्यावा लागत नाही आणि आठ वर्षांनंतर सोन्याच्या तेव्हाच्या दरानुसार तुम्हाला तुमचे मूल्य परत दिले जाते. त्यामुळे प्रत्यक्ष सोन्याच्या धातूच्या रुपात सोने खरेदी करण्याऐवजी गुंतवणुकीसाठी सॉवरेन गोल्ड बॉण्ड हा चांगला पर्याय ठरतो.
(गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. संपूर्ण माहिती काढूनच गुंतवणूक करा)
हेही वाचा :
करोडो रुपयांचं 400 किलो सोनं क्षणात लंपास, जगाला हादरवून सोडणाऱ्या दरोड्यात दोन भारतीय वंशाचे चोर!
EVM मशीन तयार करणाऱ्या कंपनीचा नाद खुळा, पाच वर्षांपूर्वी पैसे गुंतवणारे आज झाले मालामाल!
तुम्ही गुंतवलेल्या पैशांचं LIC नेमकं करते तरी काय? उत्तर वाचून विश्वास बसणार नाही!