(Source: ECI/ABP News/ABP Majha)
व्हेज थाळी महागली, किंमतीत 5 टक्क्यांची वाढ; दर वाढण्याची कारणं काय?
नोव्हेंबर 2023 मध्ये व्हेज थाळी (Veg Thali) महाग झाली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात व्हेज थाळीच्या किंमतीत 5 टक्क्यांची वाढ झाली आहे.
Veg Thali Inflation : सध्या देशातील वातावरणात साततत्यानं बदल (Climate Chnage) होत आहे. कुठे थंडीचा कडाका आहे, तर कुठे अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) कहर केला आहे. अवकाळी पावसाचा शेती पिकांवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. पावसामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात झालेली घट आणि सणासुदीच्या काळात वाढलेली मागणी यामुळं नोव्हेंबर 2023 मध्ये व्हेज थाळी (Veg Thali) महाग झाली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात व्हेज थाळीच्या किंमतीत 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. रेटिंग एजन्सी क्रिसिलने याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे.
कांदा आणि टोमॅटोच्या दरात वाढ
नोव्हेंबर महिन्यात कांद्याच्या दरात 50 टक्के तर टोमॅटोच्या दरात 35 टक्के वाढ झाली होती. क्रिसिलने आपल्या रोटी राइस रेट इंडेक्समध्ये म्हटले आहे की, या दोन खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्यामुळं व्हेज थालीच्या किमतीत वाढ झाली आहे. यापूर्वी ऑगस्ट 2023 मध्ये व्हेज थाळीच्या किमतीत 24 टक्क्यांनी वाढ झाली होती.
नोव्हेंबर 2022 च्या तुलनेत व्हेज थाळी 9 टक्क्यांनी महाग
जून 2023 पासून देशात टोमॅटोच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती. जेव्हा टोमॅटो किरकोळ बाजारात 300 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होते. सप्टेंबरपासून टोमॅटोचे दर नरमले आणि ऑक्टोबरपासून कांद्याचे भाव वाढू लागले. यामुळे नोव्हेंबर 2023 मध्ये शाकाहारी जेवणाच्या थाळीची किंमत गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर 2022 च्या तुलनेत 9 टक्क्यांनी महाग झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात कांद्याच्या दरात 93 टक्के तर टोमॅटोच्या दरात 15 टक्के वाढ झाली आहे. डाळींचे भाव वाढल्यानं व्हेज थाळीही महाग झाली आहे. नोव्हेंबर 2022 च्या तुलनेत यावर्षी नोव्हेंबरमध्ये डाळींच्या किमतीत 21 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
नॉनव्हेज खाणाऱ्यांना दिलासा
नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी नोव्हेंबर महिना चांगला गेला आहे. चिकनचे दर घसरल्याने नॉनव्हेज थाळी स्वस्त झाली आहे. मांसाहारी थाळीमध्ये 50 टक्के चिकनचा समावेश होतो. नॉनव्हेज थाळीमध्ये व्हेज थाळी सारख्याच गोष्टी असतात. मांसाहारी थाळीमध्ये फक्त डाळऐवजी चिकनचा समावेश केला जातो.
महत्त्वाच्या बातम्या: