Paytm : 33 हजार कोटींच्या गुंतवणुकीनंतर 15700 कोटींचा तोटा, चीनच्या कंपनीचा पेटीएममधील भागीदारी विकून काढता पाय
Paytm : चीनमधील उद्योजक जॅक मा याच्या एंट या कंपनीनं पेटीएममधील भागीदारी 3803 कोटी रुपयांना विकली आहे. जॅक माच्या कंपनीला पेटीएममधील गुंतवणुकीवर तोटा सहन करावा लागला.

मुंबई: चीनचे उद्योजक जॅक मा यांच्या एंट ग्रुपच्या एंट फायनान्शिअलनं पेटीएमची पेरेंट कंपनी वन 97 कम्युनिकेशन्स मधील त्यांची भागीदारी विकली आहे. एंट फायनान्शिअल कंपनीला या डीलमध्ये 15700 कोटी रुपयांचं म्हणजेच 2 अब्ज डॉलरचं नुकसान सहन करावं लागलं आहे. जॅक माच्या कंपनीकडे पेटीएममध्ये 5.84 भागीदारी होती. एंट फायनान्शिअल कंपनीनं 3803 कोटी रुपयांना पेटीएममधील भागीदारी विकली आहे.
एंट फायनान्शिअलनं ही डील 1020 प्रति शेअर रुपये या प्रमाणं केली आहे. सोमवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर पेटीएमचा शेअर 1078.20 रुपयांवर होता. त्यापेक्षा 5.4 टक्क्यांनी कमी किमतीवर विकले आहेत. टर्म शीटनुसार किमान मूल्य 1020 रुपयांप्रमाणं 3803 कोटी रुपयांची डील झाली आहे. गोल्डमॅन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज आणि सिटी ग्रुप ग्लोबल मार्केटस इंडियानं या डीलसाठी प्लेसमेंट एजंट म्हणून काम पाहिलं. एंट फायनान्शिअलकडे पेटीएमचे 3.73 कोटी शेअर होते.
खरंतर एंट फायनान्शिअलनं पेटीएममध्ये 27.9 टक्के भागीदारी 18.33 कोटी शेअर करेदी करत 33600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. पेटीएमच्या आरएचपीनुसार एंट फायनान्शिअलनं पेटीएमचा एक शेअर 1833.3 रुपये प्रति शेअर किमतीला खरेदी केली होती. आतापर्यंतच्या गुंतवणुकीवर एंट फायनान्शिअल कंपनीला 17838 कोटी रुपये मिळाले. म्हणजेच सुरुवातीच्या गुंतवणुकीवर त्यांना 15765 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. वन कम्युनिकेशन्स म्हणजेच पेटीएम नोव्हेंबर 2021 मध्ये शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर जॅक माच्या कंपनीनं त्यांची भागीदारी टप्प्याटप्प्यानं विकली आहे.
विजय शेखर शर्मा यांच्याकडे किती भागीदारी?
पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा आणि त्यांचं कुटुंब रेजिलिएंट असेट मॅनेजमेंट बीव्ही या विदेशी फर्मचं मालक आहे. याकडे वन 97 कम्युनिकेशन्सची 97 टक्के भागीदारी आहे. याशिवाय हाँगकाँगची खासगी इक्विटी कंपनी सैफ पार्टनर्सकडे जून 2025 मध्ये 15.34 टक्के भागीदारी आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)























