Tata Steel : टाटा स्टीलची दमदार कामगिरी; आता गुंतवणूकदारांना देणार मोठं गिफ्ट!
Tata Steel Dividend : मार्चच्या तिमाहीत टाटा स्टीलच्या नफ्यात वाढ झाली आहे. टाटा स्टीलने आपल्या गुंतवणुकदारांना 51 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे.
Tata Steel : टाटा समूहातील टाटा स्टील या कंपनीने गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. नुकत्याच संपलेल्या मार्च महिन्याच्या तिमाहीत टाटा स्टीलने दमदार कामगिरी केली आहे. त्यानंतर आता कंपनीने आपल्या भागधारकांना तब्बल 51 रुपयांचा लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय टाटा स्टीलचा शेअर आता 10:1 या प्रमाणात विभाजित होणार आहे.
टाटा स्टील कंपनी ही जगातील प्रमुख मोठी स्टील कंपनी आहे. दरवर्षी 34 दशलक्ष क्रूड स्टीलचे उत्पादन करण्याची क्षमता कंपनीची आहे. मार्चच्या तिमाहीत कंपनीचा नफा 37 टक्क्यांनी वाढला आहे.
टाटा स्टील कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, मार्च तिमाहीत टाटा स्टीलला 9835 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. वर्षभरापूर्वी मार्च 2021 मध्ये कंपनीला 7165 कोटींचा नफा झाला होता. त्या तुलनेत यंदाचा नफा 37.32 टक्क्यांनी वाढला आहे. नफा कमवण्यामध्ये कंपनीने आपल्याच समूहातील टीसीएस कंपनीलादेखील मागे सोडले आहे. त्यामुळे टाटा स्टील ही टाटा समूहात सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी झाली आहे.
आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये टाटा स्टीलला 41, 749 कोटींचा नफा झाला होता. त्याआधीचे वर्ष 2020-21 च्या तुलनेत पाचपटीने अधिक आहे. कंपनीने सांगितले की, कंपनीकडे Consolidated Cash Flow मध्ये 27,185 कोटी रुपये आहेत.
गुंतवणूकदारांना भेट
टाटा स्टीलने सांगितले की, संचालक मंडळाने Fully Paid इक्विटी शेअरवर 51 रुपये आणि Partly Paid इक्विटी शेअरवर 12.75 रुपये लाभांश देण्याची शिफारस केली आहे. त्याशिवाय संचालक मंडळाने 10:1 या प्रमाणात शेअर विभाजित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. कोरोना आणि भूराजकीय तणाव सुरू असतानादेखील कंपनीने दमदार कामगिरी केली असल्याचे टाटा स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ टी. व्ही. नरेंद्रन यांनी म्हटले. या आर्थिक वर्षात टाटा स्टीलच्या शेअर दरात 14 टक्क्यांनी वाढ झाली.
इतर महत्त्वाच्या बातम्या: