Power Crisis : कोळसा संकट अधिक गडद; 20 दिवसांसाठी 1100 हून अधिक ट्रेन रद्द करण्याचा निर्णय
Power Crisis : कोळशा अभावी वीज निर्मिती केंद्रात उद्भवलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी कोळसा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी भारतीय रेल्वेने प्रयत्न सुरू केले आहेत.
Coal Crisis : कडक उन्हामुळे देशभरात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत अनेक राज्यांमध्ये कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे वीजनिर्मिती केंद्रांमध्ये वीजनिर्मितीचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या समस्येचा सामना करण्यासाठी, आता रेल्वे मंत्रालयाने पुढील 20 दिवसांसाठी 1100 पॅसेंजर गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून कोळशाने भरलेल्या मालगाड्या जलदगतीने पाठवता येतील.
गेल्या वर्षीपासून कोळशाच्या मागणीत आणि वापरात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एप्रिल 2021 च्या तुलनेत यावर्षी एप्रिलमध्ये 15 टक्के जास्त कोळशाची वाहतूक झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कोळशाची मागणी आणि वापर लक्षणीय वाढला आहे. त्यामुळे कोळशाची अधिक प्रमाणात वाहतूक होत असल्याचं रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्हीके त्रिपाठी यांनी म्हटलं आहे.
मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या तुलनेत अतिरिक्त कोळसा रेक अधिक प्राधान्याने चालवले जात आहेत. या मुद्द्यावर केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनीही अनेक राज्यांमध्ये कोळशाचा तुटवडा असल्याचे मत व्यक्त केले. रशिया-युक्रेन युद्धामुळे कोळशाच्या आयातीवर परिणाम झाला आहे. याशिवाय कोळसा कंपन्यांची थकबाकी न भरल्याने आणि झारखंडमध्ये संपामुळे कोळसा संकट निर्माण झाल्याचे आर के सिंग यांचं म्हणणं आहे.
रद्द गाड्यांमध्ये एक्सप्रेस आणि पॅसेंजरचा समावेश
पुढील 20 दिवस रेल्वेने 1100 गाड्या रद्द केल्याने प्रवाशांसह व्यापारीही प्रचंड नाराज होणार आहेत. कोळसा संकटाला तोंड देण्यासाठी रेल्वेने असा निर्णय घेतला आहे. 15 टक्के अतिरिक्त कोळशाची वाहतूक होत असल्याचे रेल्वेचे मत आहे. या संदर्भात, रेल्वेने आता पुढील 20 दिवस सुमारे 1100 गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांमध्ये मेल एक्सप्रेस आणि पॅसेंजर या दोन्ही गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. एक्स्प्रेस गाड्यांच्या 500 फेऱ्या, तर पॅसेंजर गाड्यांच्या 580 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
या राज्यांमध्ये कोळशाच्या टंचाईची समस्या
उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा यासह अनेक राज्यांमध्ये कोळसा संकटामुळे विजेची समस्या निर्माण झाली होती. यानंतर केंद्र सरकारने अनेक बैठका घेतल्या. अनेक राज्यांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला, त्यामुळे लोकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आता ही समस्या आणखी वाढू नये यासाठी पावले उचलली जात आहेत.
यापूर्वीही ६७० प्रवासी गाड्या रद्द
यापूर्वीही असा प्रश्न ऐरणीवर आलेला होता तेव्हाही असाच निर्णय रेल्वेने घेतला होता. याआधीही रेल्वेने एक महिन्यासाठी ६७० प्रवासी गाड्या रद्द केल्या आहेत. जेणेकरून कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाड्यांची वारंवारता वाढवता येईल. त्यामुळे छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश आणि झारखंड यांसारख्या कोळसा उत्पादक राज्यांतून ये-जा करणाऱ्या लोकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो. मात्र वीज संकटाची परिस्थिती निर्माण होऊ नये, तसेच कोळशाचा पुरवठा जास्तीत जास्त व्हावा, यासाठी असे निर्णय घेतले जात आहेत.