कोरोनात व्यवसाय पडला बंद, तरुणानं ठेवलं शेतीत पाऊल, आज सफरचंद शेतीतून मिळवतोय लाखो रुपये
एका युवा शेतकऱ्याने सफरचंद शेतीतून आर्थिक प्रगती साधली आहे. या शेतीतून शेतकऱ्याने लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे. पाहुयात त्याची यशोगाथा.
Apple farming success story : अलिकडच्या काळात शेतकरी (Farmers) आपल्या शेतात विविध प्रयोग करताना दिसत आहे. विविध फळांची, फुलांची शेती करत आहेत. पारंपारिक पिकांना बगल देत तरुण शेतकरी शेती करत आहेत. आज आपण अशाच एका तरुण शेतकऱ्यांची यशोगाथा (success story) पाहणार आहोत. पूरणचंद (Puranchand) असं हिमाचल प्रदेशातील कांगडा (Kangra in Himachal Pradesh) येथील या शेतकऱ्याचं नाव आहे. या शेतकऱ्याने सफरचंद शेतीतून आर्थिक प्रगती साधली आहे. या शेतीतून पूरणचंदने लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी कोरोनाचं संकट आलं होतं. लॉकडाऊमुळं देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. त्या वेळी कांगड्याच्या पूरणचंद सारख्या इतर अनेकांनाही आपले भविष्य अंधकारमय वाटत होते. साथीच्या रोगामुळं त्यांचा वाहतूक व्यवसाय बंद झाला होता. यानंतर पूरणचंद यांनी पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. आज आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी सफरचंदाची लागवड करून चांगले पीक घेत आहे.
वाहतूक व्यवसाय बंद केल्यानंतर सफरचंदाची लागवड
पूरणचंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक व्यवसाय बंद केल्यानंतर सफरचंदाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. याबाबत मी खूप संशोधन केले आणि शेतकऱ्यांचा सल्ला घेतल्यानंतर मी माझ्या शेतात 40 रोपे लावली होती. शेतजमिनीच्या विकासासाठी अनुदान देण्याच्या योजनेमुळं खूप मदत झाली. तसेच फलोत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सफरचंद लागवडीची तांत्रिक माहितीही दिली होती. याशिवाय राज्य सरकारकडून गारपीटविरोधी नेटवर 80 टक्के अनुदान दिले जात होते, त्याची माहिती घेतल्याचे पुरणचंद यांनी सांगितले. सुरुवातीला कमी रोपे लावली होती. त्यानंतर रोपे वाढवल्याची माहिती पूरणचंद यांनी दिली.
सफरचंदाला प्रतिकिलो 100 ते 150 रुपये भाव मिळाला
2020 मध्ये 80,000 रुपयांची सफरचंद विकली होती. त्यानंतर 2021 मध्ये 1.5 लाख रुपयांची विक्री केल्याचे पूरणचंद यानी सांगितले. सफरचंदाच्या बागेसाठी रासायनिक खते किंवा फवारण्या करत नाही. तर पूर्णपणे सेंद्रीय शेती आहे. त्यांचे पिक लवकर बाजारात आले त्यामुळे त्यांना प्रतिकिलो 100 ते 150 रुपये भाव मिळाला. शिमला, मंडी आणि कुल्लू येथील पारंपारिक सफरचंद उत्पादक भागातील पीक जुलैच्या मध्यापासून बाजारात येण्यास सुरुवात होते. पण पुरणचंद यांनी लागवड केलेले पीकहे जूनच्या सुरुवातीला बाजारात आले, त्याचा फायदा झाला.
28,000 सफरचंद रोपांची रोपवाटिका
दरम्यान, व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी, पुरणचंद यांनी भाडेतत्त्वावर जमीन घेतली. 28,000 सफरचंद रोपांची रोपवाटिका स्थापन केली. गेल्या हिवाळ्यात त्यांनी 15,000-20,000 रोपे स्थानिक शेतकरी आणि इतर भागांना पुरवली. तसेच 20 लाखांपर्यंत नफा कमावला. आज काही देशांतील काही प्रगतीशील शेतकऱ्यांनाही सफरचंदाची रोपे पुरवली जातात. कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा आणि ईशान्येसह देशभरातील अनेक ठिकाणी सफरचंदाच्या रोपांना मागणी असल्याचे पूरणचंद यांनी सांगितले.
हिमाचलमध्ये सफरचंदाची 6000 कोटी रुपयांची अर्थव्यवस्था
हिमाचल प्रदेशमध्ये सफरचंदाची 6000 कोटी रुपयांची अर्थव्यवस्था आहे. 1.75 लाख कुटुंबांचा मुख्य आधार आहे. एकूण सफरचंदांपैकी 70 टक्के सफरचंद शिमल्यात होते. राज्यात 1.25 लाख हेक्टरमध्ये सफरचंदाचे उत्पादन होते, ज्याची उत्पादकता 3-4 टन प्रति हेक्टरपेक्षा कमी आहे. भारतात उत्पादित होणाऱ्या एकूण सफरचंदांमध्ये राज्याचा वाटा साधारणपणे 30 ते 40 टक्के असतो.