काल पडझड, आज चित्र सकारात्मक, अदानींवरील आरोपांनंतर शेअर बाजाराची नेमकी स्थिती काय? वाचा सविस्तर...
Gautam Adani : उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. या आरोपानंतर आज बाजार सावरला आहे.
मुंबई : भारतातील दिग्गज उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावर अमेरिकेत लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांनंतर भारतीय शेअर बाजारात चांगलाच हाहा:कार उडाला. 21 नोव्हेंबर रोजी अदानी उद्योग समूहाच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स पडले. यातील चार कंपन्यांना तर थेट लोअर सर्किट लागले. दरम्यान, आज शेअर बाजार चालू झाल्यानंतर सकारात्मक चित्र पाहायला मिळाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक तसेच राष्ट्रीय शेअर बाजराच्या निफ्टी निर्देशांकात वाढ झालेली पाहायला मिळाले.
बाजार सावरला मात्र...
कालच्या पडझडीनंतर आज बाजार सावरला आहे. व्यवहार सुरु होताच सेन्सेक्स 185 अंकांनी वधारला आहे. तर निफ्टीमध्ये 60 अंकांनी वाढ झाली आहे. एकंदरीतच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ झालेली असली तरी अदानी उद्योग समूहाशी निगडीत कंपन्यांच्या समभागांत मात्र विक्रीचा सपाटा कायम आहे. अदानी पोर्ट, अदानी ग्रीन, अदानी पॉवर या कंपन्यांच्या समभागांत घसरण झालेली आहे.
अदानी कंपनीच्या स्टॉक्सची सध्या काय स्थिती?
आज सकाळीच शेअर बाजार सावरला असला तरी एकूणच अदानी उद्योग समूहाच्या कंपन्या मात्र अजूनही लाल निशाणीवरच आहेत. अदानी एनर्जी सोल्यूशन्स या कंपनीचा शेअर सध्या 5.93 टक्क्यांनी घसरून 656.50 रुपयांवर आला आहे. अदानी विल्मर कंपनीचा शेअर 3.19 टक्क्यांच्या घसरणीसह 285.55 रुपयांवर घसरला आहे. अदानी ग्रीन एनर्जी या कंपनीचा शेअर 1063 रुपयांवर आला आहे. या शेअरमध्ये 7.62 टक्क्यांची घसरण झाली आहे. अदानी पोर्ट्स या कंपनीच्या शेअरमध्ये 3.22 टक्क्यांची घसरण झाली आहे. हा शेअर सध्या 1076.55 रुपयांवर आला आहे.
अदानींच्या अन्य कंपन्यांच्या समभागांतही घसरण
अदानी एंटरप्रायझेस हा शेअरही 3.51 टक्क्यांनी कमी झाला असून त्याची किंमत 2014.10 रुपयांपर्यंत घसरली आहे. अदानी टोटल गॅस या कंपनीच्या शेअरमध्येही 2 टक्क्यांची घसरण झाली आहे. हा शेअर सध्या 590.25 रुपयांवर आहे. अदानी पॉवर या कंपनीचे शेअर्सही 2.56 टक्क्यांनी घसरले. हा शेअर सध्या 463 रुपयांवर आहे. दरम्यान, गौतम अदानी यांनी अमेरिकेत करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. अमेरिकेतील आरोपांनंतर अदानी उद्योग समूह कायदेशीर मार्गाने पुढील कारवाई करणार आहे.
हेही वाचा :
आला रे आला मोठा आयपीओ आला! ग्रे मार्केटमध्येही होतेय चर्चा; पैसे ठेवा तयार
आधी स्वस्त झालं, अता मोठी वाढ! जाणून घ्या सोनं नेमकं किती रुपयांनी महागलं!