(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Stock Market Holiday : मार्चमध्ये 12 दिवस बंद राहणार शेअर बाजार, तीन लाँग वीकेंडचा समावेश
Stock Market Holiday in March: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना पैसे गुंतवण्यासाठी आणि कमाई करण्यासाठी मार्च महिन्यात कमी दिवस मिळतील, कारण शेअर बाजार 12 दिवस बंद राहणार आहे.
Stock Market Holiday in March: मार्च महिना म्हणजे अनेक आर्थिक कामे संपवण्याचा महत्त्वाचा महिना. या महिन्यात आपली कामं संपवण्यासाठी अनेकांची लगबग सुरू असते. पण शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मात्र त्यासाठी कमी दिवस मिळणार आहेत. कारण मार्च महिन्यात तब्बल 12 दिवस शेअर बाजार बंद राहणार असून फक्त 19 दिवसच ट्रेडिंग चालणार आहे.
मार्चमध्ये दोन राष्ट्रीय सण
मार्चमध्ये दोन राष्ट्रीय सण आणि एक आंतरराष्ट्रीय दिन यानिमित्त तीन दिवस शेअर बाजार बंद राहणार आहे. हिंदू सण महाशिवरात्री 8 मार्च रोजी आहे आणि या दिवशी शुक्रवारी शेअर बाजार बंद राहणार आहे. 25 मार्च रोजी रंगीत होळीनिमित्त सोमवारी शेअर बाजार बंद राहणार आहे. याशिवाय ख्रिश्चन समूदायासाठी महत्त्वाचा असणाऱ्या गुड फ्रायडे निमित्त शुक्रवार, 29 मार्च रोजी भारतीय शेअर बाजार बंद राहणार आहे.
तीन सुट्ट्या आणि तीनही लाँग वीकेंड
शुक्रवार 8 मार्च – महाशिवरात्री
महाशिवरात्री हा भगवान शंकराच्या उपासनेचा महान सण 8 मार्च रोजी असून या दिवशी शेअर बाजारात कोणतेही कामकाज होणार नाही. त्याचे पुढील दिवस अनुक्रमे 9 आणि 10 मार्च रोजी शनिवार आणि रविवार आहेत. त्यामुळे शेअर बाजार 3 दिवस बंद राहणार आहे. 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन देखील साजरा केला जातो.
सोमवार 25 मार्च- होळी
रंगांचा सण होळी यंदा 25 मार्चला असून तो दिवस सोमवार आहे. म्हणजेच शनिवार-रविवारमुळे 23 आणि 24 मार्च रोजी शेअर बाजार बंद राहिल आणि हा वीकेंड सुद्धा लाँग वीकेंड असेल.
शुक्रवार 29 मार्च - गुड फ्रायडे
गुड फ्रायडे प्रामुख्याने जगभरात पसरलेल्या ख्रिश्चन समूदायाकडून साजरा केला जाते. त्यामुळे या दिवशी जागतिक बाजारपेठाही बंद राहतील आणि अमेरिकन बाजारांसह भारतीय बाजारपेठांमध्ये सुट्टी असेल.
पहिल्या शनिवारी शेअर बाजाराचे विशेष सत्र
शनिवार, 2 मार्च रोजी, NSE आणि BSE ने विशेष ट्रेडिंग सत्र आयोजित करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मार्चचा पहिल्या शनिवारी शेअर बाजाराचे कामकाज सुरू असेल. इक्विटी आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह विभागामध्ये 2 मार्च रोजी ट्रेडिंग होईल. या दिवशी आपत्ती पुनर्प्राप्ती साइट (DR साइट) वर इंट्राडे स्विच ओव्हर केले जाईल. या दिवशी दोन विशेष ट्रेडिंग सत्र आयोजित केले जातील, ज्यामध्ये पहिले ट्रेडिंग सत्र सकाळी 9.15 ते सकाळी 10 आणि दुसरे ट्रेडिंग सत्र सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 या वेळेत होईल.
हे विशेष सत्र आधी 20 जानेवारीला होणार होते, परंतु अयोध्येत राम लल्लाच्या अभिषेक कार्यक्रमामुळे 22 जानेवारीला देशांतर्गत शेअर बाजार बंद ठेवण्यात आला होता. या बदल्यात 20 जानेवारी (शनिवार) रोजी शेअर बाजार खुला ठेवण्यात आला, त्या दिवशी सामान्य कामकाज झाले.
ही बातमी वाचा: