Gold Silver Price Today:चांदीच्या दरानं 3 लाखांचा टप्पा ओलांडला, आजवरचा विक्रमी दर! सोन्यालाही झळाळी, जाणून घ्या आजचा दर
silver price today 12-thousand-rupees-per-kg-increase-in-single-day-khamgaon-buldhana-marathi-news-1403774

देशभरात प्रसिद्ध असलेल्या खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत आज पुन्हा चांदीचा भाव उच्चांक स्तरावर पोहोचला आहे. खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत चांदीचे आजचे भाव तीन लाख चार हजार रुपये प्रति किलो झाले असून अमेरिकेने लादलेले निर्बंध, टेरिफ, इराण आणि वेनिंजुएलामध्ये असलेली अस्थिरता, व्याजदरात झालेली कमतरता यामुळे चांदी आणि सोन्याचे भाव वाढल्याचे व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, आगामी काळात असेच भाव वाढत राहतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. मात्र वाढत्या चांदीच्या भावामुळे चांदीचे 70 टक्के ग्राहक कमी झाल्यामुळे चांदीच्या बाजारपेठेत मोठी मंदी बघायला मिळत आहे.
दुसरीकडे, जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या-चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. चांदीच्या दराने तीन लाखांचा टप्पा ओलांडला असताना सोन्याच्या दरात तब्बल 2 हजारांनी तर चांदीच्या दरात 10 हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 48 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 3 लाख 3 हजार 850 रुपयांवर पोहोचले आहेत.
सोन्याचा दर कसा ठरतो?
सोने आणि चांदीचे दर दररोज निश्चित होतात. सोन्याच्या दरातील तेजी आणि घसरणीमागं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घटक कारणीभूत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे दर अमेरिकन डॉलरमध्ये निश्चित होतात. यामुळं डॉलर- रुपया विनिमय दरातील बदलाचा थेट परिणाम भारतीय बाजारावर होतो. डॉलर मजबूत झाला तर रुपया कमजोर होतो आणि भारतीय बाजारात सोने आणि चांदीचे दर वाढतात.
भारत मोठ्या प्रमाणावर सोने आयात करतो. आयात शुल्क, जीएसटी आणि स्थानिक कर याचा परिणाम सोन्याच्या दरांवर होत असतो. करात बदल झाला असल्यास सोने आणि चांदीचे दर वर किंवा खाली होतात. जागतिक स्तरावर युद्ध, भू राजनैतिक तणाव, आर्थिक मंदी किंवा व्याज दरातील बदलांचा सोन्याच्या दरावर परिणाम होतो. जेव्हा बाजारात अनिश्चितता वाढते तेव्हा गुंतणूकदार भांडवली बाजारात पैसे गुंतवण्याऐवजी सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करतात. भारतात सोन्याला फक्त गुंतवणूक म्हणून नाही तर सांस्कृतिक महत्त्व देखील आहे. लग्नसराई, सण आणि शुभकार्या प्रसंगी सोन्याची मागणी वाढते.























