Share Market : शेअर बाजारासाठी 'ब्लॅक मंडे', Sensex 2,226 तर Nifty 742 अंकांनी घसरला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या 16 लाख कोटींचा चुराडा
Stock Market Updates : ट्रेन्ट, टाटा स्टील , JSW Steel, हिंडल्को अशा कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ अस्त्रामुळे जगभरातील शेअर बाजार कोलमडल्याचं दिसून आलं. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक तब्बल 2226 अंकानी घसरला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 742 अंकांनी घसरला. शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 73,137 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 22,161 अंकांवर बंद झाला. यामुळे भारतीय गुंतवणूकदारांचा एकाच दिवसात 16 लाख कोटी रुपयांचा चुराडा झाला. जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं.
अमेरिकेने जगभरातील देशांवर लावलेल्या आयात शुल्क धोरणाचा परिणाम हा जगभरातील शेअर बाजारांवर दिसून आला. त्यामध्ये भारतीय शेअर बाजारालाही मोठा फटका बसल्याचं दिसून आलं. सोमवारी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स 3600 हून अधिक अंकांनी घसरला. तर निफ्टी 1400 अंकांनी घसरला. त्यानंतर काहीसा सावरत बाजार बंद होताना सेन्सेक्स 2,226 अंकांनी तर निफ्टी 742 अंकांनी कोसळला.
16 लाख कोटी रुपयांचे नुकसान
या आधी जून 2024 साली मोठ्या प्रमाणात बाजार कोसळला होता आणि गुंतवणूकदारांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं होतं. आता दहा महिन्यातील नीचांकी पातळी गाठली असून भारतीय बाजारातील गुंतवणूकदारांना तब्बल 16 लाख कोटी रुपयांचे नुकसान सोसावं लागलं आहे.
यातून बाजार सावरेल अशी शक्यता व्यक्त केली जात असली तरी नुकसान झालेल्या गुंतवणुकीची रिकव्हरी किती काळात होईल हे अद्याप निश्चित नाही. त्यामुळे गुंतवणूकदार देखील चिंतेत आहेत.
भारतीय रुपया घसरला
शेअर बाजाराच्या घसरणीचा परिणाम भारतीय रुपयावरही झाला असून डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 61 पैशांनी घसरला. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमत 85.84 वर बंद झाली.
भारतासोबतच अमेरिका आणि इतर शेअर बाजारातही मोठ्या प्रमाणात घसरण झाली. हाँगकाँगच्या शेअर बाजारात 13 टक्क्यांची घसरण झाली. 1997 नंतरची ही सर्वात मोठी घसरण झाली आहे. तर भारताचा शेजारी पाकिस्तानच्या शेअर बाजारातही 5 टक्क्यांहून अधिक घसरण झाली.
जगाचा मंदीकडे प्रवास सुरू?
ट्रम्प यांच्याकडून आयात कर लादल्यानंतर चीनकडून देखील अमेरिकेवर आयात लादला आहे. सोबतच, युरोपियन युनियनकडून देखील तशीच तयारी दिसते आहे. असं झाल्यास ऑटोमोबाईल क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, आयफोन, फार्मा आणि आयटी क्षेत्रावर मोठे परिणाम दिसू शकतील अशात व्यापार युद्धाला सुरुवात झाल्याने जग आर्थिक मंदीच्या सावटाखाली उभं आहे.
ही बातमी वाचा:
























