Share Market Crash: शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्समध्ये 650 अंकाची घसरण, निफ्टी 16000 अंकाखाली
Share Market Crash : जागतिक शेअर बाजारातील विक्रीच्या दबावाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर आजही दिसून आला. सेन्सेक्समध्ये 650 अंकाची घसरण झाली आहे.
Share Market : भारतीय शेअर बाजारात सुरू असलेली पडझड अद्यापही थांबण्याची चिन्हं दिसत नाही. शेअर बाजार सुरू होताच 650 अंकानी घसरला. तर निफ्टी निर्देशांकही 16000 अंकाच्या खाली आला आहे. शेअर बाजारात आजही विक्रीचा सपाटा सुरू राहणार असल्याची चिन्हं आहेत. जागतिक शेअर बाजारातही विक्रीचा दबाव असल्याचे दिसून येत आहे.
सेन्सेक्सची सुरुवात आज घसरणीसह झाली. सुरुवातीलाच सेन्सेक्स 644.54 अंकानी म्हणजे 1.19 टक्क्यांनी घसरला. तर, निफ्टी निर्देशांक 174.10 अंकानी घसरला. निफ्टी निर्देशांक 16000 अंकाखाली आला असून 15,993 अंकावर व्यवहार करत होता.
प्री-ओपनिंगनंतर शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर 15 मिनिटात सेन्सेक्समधील घसरण वाढत गेली. सेन्सेक्स 850 अंकानी कोसळला. तर, निफ्टी निर्देशांकात 255.10 अंकानी घसरण झाली. काही महिन्यापूर्वी 60 हजार अंकाचा टप्पा ओलांडला सेन्सेक्स सध्या 53,237.61 अंकावर व्यवहार करत आहे. तर, निफ्टी सध्या 15,912 अंकावर व्यवहार सुरू आहे.
निफ्टी 50 मधील 48 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. बँक निफ्टीदेखील 612.30 अंक म्हणजे 1.76 टक्क्यांची घसरण दिसून आली. बँक निफ्टी 34,080.85 अंकावर ट्रेड करत आहे.
जागतिक शेअर बाजारातही विक्रीचा दबाव असल्याचे संकेत आहेत. आशियाई शेअर बाजारातही मोठा दबाव आहे. SGX NIFTY निर्देशांक 170 अंकाखाली आहे. तर, दुसरीकडे एप्रिल महिन्यातही अमेरिकेत किरकोळ महागाई 8.3 टक्क्यांवर राहिल्याने अमेरिकन शेअर बाजारात विक्रीच्या सपाट्याने घसरण झाली आहे. बुधवारी, Dow Jones निर्देशांकात 300 अंकाहून अधिक घसरण नोंदवण्यात आली होती.
अमेरिकेत महागाईने मागील 40 वर्षातील उच्चांक गाठला आहे. तर, दुसरीकडे भारतातही आज एप्रिल महिन्यातील किरकोळ महागाई दराचे आकडे जाहीर होणार आहे. एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई दरात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकदेखील पुढील पतधोरणात रेपो दर वाढवण्याची शक्यता आहे. त्याचा परिणामही बाजारावर दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
