(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market Closing Bell: अब की बार 63000 पार! सेन्सेक्सची ऐतिहासिक भरारी; निफ्टीचीदेखील 19000 अंकांकडे वाटचाल
Share Market Closing Bell: भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने ऐतिहासिक भरारी घेताना 63000 अंकांचा टप्पा गाठला. तर, निफ्टीदेखील 18750 अंकांवर आहे.
Share Market Touch All Time High: भारतीय शेअर बाजारात आज ऐतिहासिक पल्ला गाठला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 63000 अंकांचा पल्ला गाठला (Sensex Touch 63000 Points). मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात तुफान खरेदीमुळे तेजी दिसून येत होती. आज मात्र, सेन्सेक्सने (Sensex) ऐतिहासिक टप्पा पार केला. सलग सात सत्रांपासून बाजारात तेजी दिसून येत आहे.
आज बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा सेन्सेक्स निर्देशांक 417.81 अंकांच्या तेजीसह 63,099.65 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 140.30 अंकांनी वधारत 18,758.30 अंकांवर बंद झाला. आज बाजारात व्यवहार झालेल्या कंपन्यांपैकी 1992 कंपन्यांचे शेअर दर वधारले होते. तर, 1395 कंपन्यांचे शेअर दर घसरले. 104 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही.
आज दिवसभरातील व्यवहारात सरकारी बँकांचा निर्देशांक वगळता इतर सर्व सेक्टरमध्ये चौफेर खरेदी दिसून आली. बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, रियल इस्टेट, एनर्जी आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या सेक्टरमध्ये मोठी तेजी दिसून आली. किरीट पारेख समितीच्या शिफारसींचा परिणाम गॅस कंपन्यांच्या शेअर दरावर दिसून आला. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर दरात चांगली तेजी दिसून आली आहे.
सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 23 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, सात कंपन्यांचे शेअर दर घसरले. निफ्टी 50 पैकी 42 कंपन्यांचे शेअर दर वधारले होते. तर, आठ कंपन्यांचे शेअर घसरले होते.
आज शेअर बाजारात महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या शेअर दरात 4 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, अल्ट्राटेक सिमेंट 2.16 टक्के, पॉवरग्रीड 2.14 टक्के, हिंदुस्तान युनिलिव्हर 1.78 टक्के, भारती एअरटेल 1.71 टक्के, टायटन कंपनी 1.59 टक्के, एशियन पेंट्स 1.51 टक्के आणि टाटा स्टीलच्या शेअर दरात 1.51 टक्क्यांची तेजी दिसून आली.
तर, इंडसइंड बँकेच्या शेअर दरात 1.02 टक्क्यांची घसरण दिसून आली. एसबीआयच्या शेअर दरात 0.97 टक्के, एचसीएल टेक 0.66 टक्के, आयटीसीच्या शेअर दरात 0.58 टक्के, बजाज फिनसर्व्हच्या शेअर दरात 0.33 टक्के, बजाज फायनान्सच्या शेअर दरात 0.17 टक्के आणि टीसीएसच्या शेअर दरात 0.14 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.
आज शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात तेजीत झाली. मात्र, काही वेळेनंतर नफावसुली सुरू झाल्याने काही वेळाने बाजारात घसरण दिसून येऊ लागली. त्यामुळे बाजारात विक्रीचा सपाटा दिसून येणार का, अशी शंका गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झाली होती.