Share Market: दिवसभरातील मोठ्या अस्थिरतेनंतर सेन्सेक्स 103 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 51,000 कोटी रुपये पाण्यात
Stock Markets Updates: ऑटो, एमएमसीजी, मेटल्स आणि रिअॅलिटी या शेअर्समध्ये आज मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं दिसून आलं.
मुंबई: शेअर बाजारासाठी (Stock Markets Updates) आजचा दिवस मोठ्या अस्थिरतेचा असल्याचं दिसून आलं. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) आज 103 अंकांची घसरण झाल्याचं दिसून आलं. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) आज 33 अंकाची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.17 टक्क्यांची घसरण होऊन तो 61,702 अंकांवर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 0.18 टक्क्यांची घसरण होऊन तो 18,387 अंकांवर स्थिरावला.
शेअर बाजारात आज एक वेळ अशी आली होती की सेन्सेक्समध्ये तब्बल 700 अंकांची घसरण झाली होती. त्यानंतर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर रिकव्हरी झाल्याचं दिसून आलं. आज ऑटो, एफएमसीजी आणि रिअॅलिटी शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. आजच्या घसरणीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या आज 51 हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं.
शेअर बाजारात आज झालेल्या घसरणीमुळे मुंबई शेअर बाजाराचे एकूण भांडवल हे 287.39 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. सोमवारी हे भांडवल 287.90 लाख कोटी रुपये इतकं होतं. सोमवारी शेअर बाजारात तेजी असल्याचं दिसून आलं होतं, मात्र ती तेजी आज कायम राहिली नाही.
Stock Markets Updates: या पाच शेअर्समध्ये आज 1.26 टक्क्यांपर्यंत वाढ
सेन्सेक्समधील 30 शेअर्समधील 11 शेअर्समध्ये आज वाढ झाल्याचं दिसून आलं. त्यामध्ये टीसीएस, रिलायन्स इंड्स्ट्रिज, अॅक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट आणि इंडसइंड बँकाच्या शेअर्सचा समावेश आहे. या पाच शेअर्समध्ये आज एकूण 0.43 टक्के तर 1.26 टक्क्यांपर्यंत वाढ झाली.
Stock Markets Updates: या पाच शेअर्समध्ये आज घसरण
सेन्सेक्समधील उर्वरित 19 शेअर्समध्ये आज घसरण झाल्याचं दिसून आलं. यामध्ये टाटा मोटर्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, महिंद्रा अॅंड महिंद्रा, लर्सन अॅन्ड ट्रुबो आणि भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये आज 1.23 ते 1.88 टक्क्यांची घसरण झाली.
Stock Markets Updates: शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने
आज सकाळी शेअर बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाली तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 197 अंकांच्या घसरणीसह 61,608.85 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 80.15 अंकांच्या घसरणीसह 18,340.30 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 447 अंकांच्या घसरणीसह 61,358.41 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 119 अंकांच्या घसरणीसह 18,301.05 अंकांवर व्यवहार करत होता.