Rakesh Jhunjhunwala: राकेश झुनझुनवाला यांचे विचार, ज्याने तुम्ही ठरू शकता यशस्वी गुंतवणूकदार
Rakesh Jhunjhunwala: शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला यांनी गुंतवणूक करताना काही नियमांचे पालन केले. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना त्यांनी काही कार्यक्रमातून सल्लेही दिले आहेत.
Rakesh Jhunjhunwala: भारतीय शेअर बाजारातील 'बिग बुल' अशी ओळख असलेले राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले. राकेश झुनझुनवाला यांचा शेअर बाजारातील प्रवास हा एखाद्या दंतकथेप्रमाणे भासावा असा राहिला आहे. अवघ्या पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून शेअर बाजारातील प्रवासाला सुरुवात करणाऱ्या झुनझुनवाला यांनी जवळपास 44 हजार कोटींचे साम्राज्य उभे केले आहे. शेअर बाजारात राकेश झुनझुनवाला यांच्या हालचालींवर अनेकांचे लक्ष असायचे.
राकेश झुनझुनवाला यांचा जन्म 5 जुलै 1960 रोजी झाला. मुंबईतील सिडनहॅम महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते चार्टर्ड अकाऊंटंटही झाले. महाविद्यालयीन जीवनापासून राकेश झुनझुनवाला यांचा ओढा शेअर बाजाराकडे होता. अवघ्या पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीने त्यांनी बाजारातील व्यवहाराला सुरुवात केली. राकेश झुनझुनवाला यांनी बाजारातील व्यवहाराला सुरुवात केली होती तेव्हा सेन्सेक्स निर्देशांक 150 अंकाच्या आसपास होता. सध्या सेन्सेक्स 60 हजार अंकांच्या आसपास व्यवहार करत आहे. राकेश झुनझुनवाला यांनी विविध कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमातून त्यांनी अनेकदा गुंतवणूकदारांना महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. राकेश झुनझुनवाला खरेदी करत असलेल्या शेअर्सकडे अनेकांचे लक्ष असायचे. झुनझुनवाला यांनी शेअर बाजारात अभ्यास आणि शिस्त यांच्या जोरावर बाजारात चांगला नफा कमावला.
>> झुनझुनवाला यांच्याकडून शिकू शकता या पाच गोष्टी
शेअर दराचा आदर करा
शेअर दराचा नेहमी आदर करा. प्रत्येक दरावर एखादा खरेदी करणारा असतो आणि एखादा विक्री करणारा असतो. कोण योग्य आणि कोण चुकीचा आहे, हे वेळ ठरवते. त्यामुळे शेअर दराचा आदर करा. काही वेळेस तुम्हीदेखील चुकीचे ठरू शकता.
उधारीच्या पैशांनी गुंतवणूक नको
उधारीच्या पैशांनी कधीच गुंतवणूक करू नका. शेअर बाजाराबाबत तुमचा अंदाज चुकीचा ठरू शकतो. तुम्ही एखाद्या वेळी एका कंपनीचे शेअर्स खरेदी केले आणि तुमच्या अंदाजानुसार त्या शेअरचा दर वधारला अथवा घसरला नाही तर तुम्हाला नुकसान होऊ शकते. अशावेळी उधारीने घेतलेल्या पैशांमुळे तुमची चिंता आणखी वाढू शकते.
गुंतवणूक शिकवली जाऊ शकत नाही
तुम्ही ज्या चुका सहन करू शकता, अशाच चुका करा. त्यामुळे पुढील तुम्ही पुढील चुका टाळू शकता. तुम्ही जी चूक करता तीच चूक पुन्हा करणे टाळले पाहिजे. त्याच चुका वारंवारपणे करणे म्हणजे तुम्ही भूतकाळातून काही शिकलाच नाहीत, असा अर्थ होतो.
RISK पासून सावध
RISK या चार शब्दांपासून सावध राहा. शॉर्ट टर्ममध्ये तुम्ही जेवढे नुकसान सहन करू शकता. तेवढीच गुंतवणूक करा. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी तुम्ही रिस्क प्रोफाइल तपासून पाहायला हवे. अनेकदा गुंतवणूकदार अधिक जोखीम स्वीकारतात आणि स्वत: च्या अडचणी वाढवतात.
आशावादी राहा
शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला आशावादी राहावे लागेल. गुंतवणूकदार म्हणून आशावादी असले पाहिजे. शेअर बाजारात तुमच्या संयमाची, धैर्याची परीक्षा होते. शेअर बाजारात उतावीळ असणे चांगले नसते.