Share Market : एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 10 लाख कोटींचा फटका; जाणून घ्या शेअर मार्केट का कोसळलं?
Share Market : परकीय गुंतवणूकदार (FII) गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर मार्केटमधून आपली गुंतवणूक काढून घेत असल्याचं समोर आलं आहे. येत्या बजेटचा परिणामही शेअर मार्केटवर होताना दिसतोय.
मुंबई : गेल्या पाच सत्रात शेअर बाजारात गुंतवणूकदारांचं अठरा लाख कोटींचं नुकसान झालं आहे. आजच्या सत्रात म्हणजे आज दिवसभरात शेअर बाजारात तब्बल दहा लाख कोटींचं नुकसान झालं असेल असा अंदाज मिंटने दिलेल्या एका वृत्तामध्ये वर्तवण्यात आला आहे.
परकीय गुंतवणूकदार भारतीय मार्केटमधून आपली गुंतवणूक काढून घेत असल्याचं दिसून येतंय. त्यामागे अनेक कारणं आहेत. रशिया-युक्रेनच्या सीमेवर असलेला तणाव आणि यूएस फेडने व्याजदर वाढवण्याचे दिलेले संकेत या कारणांमुळे जागतिक स्तरावर भांडवली बाजारात मोठी अस्थिरता दिसून येतेय.
सेन्सेक्समध्ये आज दिवसभरात 1545 अंकांची पडझड झाली आणि तो 57 हजार 491 अंकावर स्थिरावला. तर मेटल, ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, रिअॅलिटी क्षेत्रात दोन ते सहा टक्क्यांची पडझड झालीय. रिलायन्सच्या शेअरमध्येही 4 टक्क्यांहून अधिकची घसरण झालीय. गेल्या काही महिन्यांमध्ये लक्षणीय पद्धतीनं वाढलेल्या आधुनिक पद्धतीच्या म्हणजे NEW AGE BUSINESS असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये देखील लक्षणीय घसरण आज दिसून आली. यात पेटीएम, झोमॅटो, कार ट्रेड, पीबी फिनटेक सारख्या अनेक कंपन्याचा समावेश आहे
बजेटचा परिणाम
देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा येत्या 1 फेब्रुवारीला सादर करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे येत्या बजेटमध्ये अर्थमंत्री काय घोषणा करणार याकडे बाजारातल्या गुंतवणूकदारांच्या नजरा लागल्या आहेत.
जागतिक बाजार सध्या सर्वत्रच नैराश्येचं वातावरण आहे. अशातच क्रिप्टोकरन्सीच्या बाजारात देखील मोठी पडझड पाहायला मिळाली. गुंतवणूदारांच्या फेवरेट बिटकॉईनमध्ये एका दिवसात 12 टक्क्यांची पडझड झाली..
शेअर बाजार का कोसळला?
गेल्या पाच सत्रामध्ये शेअर बाजारामध्ये 3000 पेक्षा जास्त अंकांची घसरण झाल्याचं दिसून येतंय. त्यामागे वेगवेगळी कारणं आहेत.
1. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याज दरवाढीचे संकेत.
2. इंधन दरात सातत्यानं होत असलेली दरवाढ.
3. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांचं नफा-वसुलीला प्राधान्य.
4. जागतिक बाजारांमध्ये होणाऱ्या पडझडीचे परिणाम भारतीय बाजारावर.
5. आगामी अर्थसंकल्पामुळेही भांडवली बाजारात अस्थिरतेची शक्यता.
परकीय गुंतवणूकदार भारतीय मार्केटमधून पैसे काढून घेतले जात असून ते इंडोनेशिया, थायलंड आणि फिलिपिन्समध्ये गुंतवण्यात येत असल्याचं समोर आलं आहे.
शेअर मार्केट तज्ज्ञांच्या मते, या वर्षी भारतातील प्रमुख स्टॉक इंडेक्समध्ये झालेली वाढ, प्रचंड तरलता आणि किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढलेल्या संख्येमध्ये ओव्हर व्हॅल्यूएशनची चिंता वाढली आहे. मॉर्गन स्टॅनलेने भारताला 'ओव्हरवेट' या श्रेणीतून 'इक्वल वेट' या श्रेणीत टाकलं आहे.
संबंधित बातम्या :
- Share Market : ब्लॅक मंडे! शेअर मार्केट गडगडला, Sensex 1545 अंकांनी घसरला तर Nifty 17200 पर्यंत खाली
- Budget 2021: बजेटची सुरुवात कशी झाली? त्यात काय-काय बदल झाले? जाणून घ्या बजेटविषयी या 17 रंजक गोष्टी
- दिल्लीतून चार कोटी रुपयांची क्रिप्टोकरन्सी 'हमास' दहशतवाद्यांनी चोरली, सायबर पोलिसांच्या तपासात उघड