Share Market Closing Bell: कर्ज महागले तरी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स, निफ्टी सुस्साट
Share Market Closing Bell : आरबीआयने रेपो दर जाहीर केल्यानंतर शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक वधारत बंद झाले.
Share Market Closing Bell: रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.50 टक्क्यांची (RBI Hikes Repo Rate) वाढ केल्यानंतरही आज भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. आरबीआयने पतधोरण जाहीर केल्यानंतर बँकिंग शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 1016.96 अंकांनी वधारत 57,426.92 अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 276.20 अंकांच्या तेजीसह 17,094.30 अंकांवर बंद झाला.
आज सकाळी बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा अस्थिरतेचे संकेत दिसून येत होते. अमेरिकन आणि आशियाई शेअर बाजारात झालेली घसरण आणि आरबीआयकडून होणारी व्याज दरातील संभाव्य वाढ पाहता भारतीय शेअर बाजारातही विक्रीचा जोर दिसून येण्याची शक्यता होती. आज, शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर विक्रीच्या सपाट्यानंतर बाजार किंचीत वधारला होता. त्यानंतर पुन्हा घसरला.
आज सकाळी बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाली तेव्हा सेन्सेक्स (Sensex) 169 अंकांच्या घसरणीसह 56,240.15 अंकांवर खुला झाला. निफ्टी (Nifty) 16,798.05 अंकांवर खुला झाला होता. त्यानंतर काही वेळेसाठी सेन्सेक्स सावरत किंचित वधारला होता. त्यानंतर पुन्हा निर्देशांक 250 अंकांपर्यंत घसरला होता.
आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर केल्यानंतर बाजारात तेजी दिसून आली. बँकिंगचे शेअर दर वधारले होते.
या स्टॉकच्या शेअर दरात चढ-उतार
हिंदाल्को इंडस्ट्री, भारती एअरटेल, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक आदी बँकांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. निफ्टी हे स्टॉक्स अधिक वधारले होते. तर, श्री सिमेंट्स, एशियन पेंट्स, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, कोल इंडिया आणि डॉ. रेड्डीज लॅब या कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली.
बँकिंगच्या शेअर्समध्ये वाढ
आरबीआयच्या पतधोरणानंतर बँकिंग शेअर्समध्ये तेजी दिसून आली. पंजाब नॅशनल बँकेच्या शेअर दरात 4.87 टक्के, फेडरल बँकेच्या शेअर दरात 4.69 टक्के, बँक ऑफ इंडियाच्या शेअर दरात 4.55 टक्के, आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या शेअर दरात 4.50 टक्क्यांची तेजी दिसून आली.
मिड कॅप आणि स्मॉल कॅपच्या शेअर दरात चांगली तेजी दिसून आली. बाजारात ऑटो, आयटी, फार्मा, मेटल्स, एनर्जी सेक्टर आदी स्टॉक्समधील शेअर दरात खरेदी दिसून आली.
बाजारात तेजी आल्याने बाजार भांडवल 272 लाख कोटींहून अधिक झाले आहे.