SEBI : युट्युब व्हिडीओच्या माध्यमातून शेअर्सच्या भावात हेराफेरी! सेबीकडून अभिनेता अर्शद वारसीवर कारवाईचा बडगा
SEBI Action : युट्युब व्हिडिओच्या माध्यमातून शेअर्समध्ये हेराफेरी केल्याचा ठपका ठेवत सेबीने अभिनेता अर्शद वारसी आणि त्याच्या पत्नीवर कारवाई केली आहे.
SEBI Action : शेअर बाजार नियामक प्राधिकरण सेबीने (SEBI) अभिनेता अर्शद वारसी (Actor Arshad Warsi) आणि त्याच्या पत्नीविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. युट्युब व्हिडीओच्या (You Tube) माध्यमातून काही कंपन्यांच्या शेअर दरात हेराफेरी केली असल्याची तक्रार सेबीला करण्यात आली होती. त्यानंतर सेबीने अर्शद वारसी आणि त्याची पत्नी मारिया गोरेट्टी यांच्यावर कारवाई केली आहे.
गुरुवारी, सेबीने एका आदेशानुसार 31 जणांवर शेअर बाजारात व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. यामध्ये अर्शद वारसी, त्याची पत्नी मारिया गोरेट्टी आणि साधना ब्रॉडकास्टचे प्रमोटर्स यांना शेअर बाजारात व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. युट्युब चॅनेलवर दिशाभूल करणारा व्हिडीओ अपलोड करून गुंतवणूकदारांना काही (Maria Goretti) विशिष्ट कंपन्यांचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला जात होता. सेबीने कंपनीचे प्रमोटर श्रेया गुप्ता, गौतम गुप्ता, सौरभ गुप्ता, पूजा अग्रवाल आणि वरूण मीडिया यांच्यावर बंदी घातली आहे.
युट्युब चॅनेलवर दिशाभूल करणारे व्हिडीओ अपलोड करून बेकायदेशीरपणे नफा कमावल्या प्रकरणी सेबीने 41.85 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सेबीने म्हटले की, अर्शद वारसीने 29.43 लाख रुपयांचा नफा कमावला. तर, वारसी यांच्या पत्नीने 37.56 लाख रुपयांचा नफा कमावला.
साधना ब्रॉडकास्टच्या शेअरच्या किंमतीत हेराफेरी होत असल्याची तक्रार सेबीकडे आली होती. शेअर्स ऑफलोड करून त्याच्या किंमतीवर प्रभाव पाडला जात असल्याची तक्रार मिळाली होती. चुकीच्या माहितीच्या आधारे दिशाभूल करणारे यूट्यूब व्हिडिओ अपलोड करून गुंतवणूकदारांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे तक्रारीत म्हटले होते. ही तक्रार मिळाल्यानंतर, एप्रिल ते सप्टेंबर 2022 दरम्यान, सेबीने या तक्रारीची चौकशी सुरू केली. एप्रिल ते जुलै 2022 दरम्यान, साधना ब्रॉडकास्टच्या शेअरची किंमत आणि व्हॉल्यूममध्ये मोठा बदल दिसून आला.
SEBI नुसार, जुलै 2022 च्या दुसऱ्या पंधरवड्यात, The Advisor आणि Moneywise या दोन युट्युब चॅनेलवर साधना ब्रॉडकास्टबद्दल खोटे आणि दिशाभूल करणारे व्हिडिओ अपलोड करण्यात आले होते. या व्हिडीओंमध्ये गुंतवणूकदारांना भरपूर नफा मिळवण्यासाठी साधनाचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. हे व्हिडीओ रिलीज झाल्यानंतर शेअरच्या किमती आणि व्हॉल्यूममध्ये मोठी उलाढाल दिसून आली. युट्यूबवर अपलोड केलेल्या व्हिडीओने प्रभावित होऊन मोठ्या प्रमाणात किरकोळ गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली.
युट्यूब व्हिडीओमध्ये काय होते?
दरम्यान, साधनाच्या प्रवर्तकांपासून ते कंपनीच्या व्यवस्थापनाशी संबंधित लोकांनी शेअर्सच्या किंमती वधारल्यानंतर शेअर्सची विक्री करून नफा कमावला. अदानी ग्रुप साधना ब्रॉडकास्ट विकत घेणार आहे आणि या डीलनंतर कंपनीच्या नफ्यात प्रचंड वाढ होईल, असा संभ्रमही यूट्यूब व्हिडिओमध्ये पसरवण्यात आला होता.
युट्यूब व्हिडीओमध्ये असे म्हटले आहे की, टीव्ही प्रोडक्शन व्यतिरिक्त ही कंपनी चित्रपट बनवणार आहे. एका अमेरिकन कॉर्पोरेशनसोबत 1100 कोटी रुपयांचा धार्मिक चित्रपट बनवण्यासाठी करार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. अमेरिकन कंपनी या चित्रपटासाठी गुंतवणूक करणार असून चित्रपटाचे हक्क साधना यांच्याकडेच राहणार असल्याचे व्हिडीओत म्हटले होते.