Rupee Falls : डॉलरच्या तुलनेत रुपया निचांकी पातळीवर, फेडच्या निर्णयानंतर शेअर बाजारही घसरला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले
Dollar Rupee अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याज दरासंदर्भातील निर्णयानंतर शेअर आणि कमोडिटी बाजारात घसरण झालीय तर चलनामध्ये देखील घट झाली आहे.
मुंबई : अमेरिकेमधील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या व्याज दर कपातीसंदर्भातील निर्णयानंतर अमेरिकेतली शेअर बाजारात देखील घसरण पाहायला मिळाली. पर्यायानं याचा परिणाम भारतीय शेअर मार्केट अन् जगभरातील शेअर बाजार गडगडले. चलनावर देखील याचा परिणाम पाहायला मिळाला. डॉलर्सच्या तुलनेत रुपया निचांकी पातळीवर पोहोचला आहे. भारताला एका डॉलरसाठी 85.06 रुपये मोजावे लागतील. अमेरिकेची सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हनं 2025 मध्ये महागाई दराचा अंदाज वाढवला आहे. तर, व्याज दरात केवळ दोन वेळा कपात करण्याचे संकेत दिले आहेत, त्या रुपयावर दबाव पाहायला मिळाला.
चलनी बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया 85.04 रुपयांवर होता. त्यानंतर तो घसरुन 85.07 रुपयांपर्यंत घसरला. गेल्या सत्रात रुपया 84.96 रुपयांवर बंद झाला होता. पहिल्यांदाच रुपया 85 रुपयांवर पोहोचला आहे. आयातदारांकडून मागणी वाढल्यानं णि शेर बाजारात समभागांची विक्री करुन विदेशी गुंतवणूकदार त्यांचे पैसे काढून घेत आहेत. त्यामुळं डॉलर्सची मागणी वाढून रुपया कमजोर होताना पाहायला मिळत आहे.
अमेरिकन फेडरल बँकेनं दोन दिवसांच्या बैठकीनंतर 18 डिसेंबरला धोरण जाहीर केलं. त्यामध्ये व्याजदरांतमध्ये 0.25 टक्के कपात केली. मात्र 2025 मध्ये महागाईचा दर 2.1 टक्क्यांवरुन 2.5 टक्के केला आहे. फेड रिझर्व्हनं 2025 मध्ये केवळ दोनवेळा व्याज कपात केली जाईल असं म्हटलं आहे. यापूर्वी एका वर्षात फेड रिझर्व्ह 4 वेळा व्याज कपात जाहीर करायची. यामुळं गुंतवणूकदारांमध्ये निराशा आहे. फेडच्या या निर्णयानंतर डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाला.
रुपयाची आणखी किती घसरण होणार?
नोव्हेंबरमधील भारताचा व्यापारातील तोटा निचांकी पातळीवर पोहोचला होता. नोव्हेंबर 2024 मध्ये व्यापारातील तोटा सर्व रेकॉर्ड मोडत 37.84 अब्ज डॉलर्सवर पोहोचला. येत्या जानेवारी महिन्यात डोनाल्ड ट्र्म्प अमेरिकेचं अध्यक्षपद स्वीकारणार आहेत. ट्रम्प यांच्या विजयानंतर देखील भारताचा रुपया घसरत आहे. ट्रम्पच्या विजयानंतर डॉलर मजबूत झाला आणि इतर चलनं कमजोर झाली.
भारतीय शेअर बाजारात आज 1000 अंकांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. शेअर बाजारातील बीएसई आणि एनएसईवरील बहुतांश कंपन्यांच्या शेअरमध्ये आज घसरण झाली. त्यामुळं भारतीय शेअर बाजाराचं बाजारमूल्य 449 लाख कोटी रुपयांवर आलं. परिणामी गुंतवणूकदारांचं 3 लाख कोटी रुपयांचं नुकसान सकाळच्या सत्रात झालं.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)