एका बाजूला तापमानात वाढ, तर दुसऱ्या बाजूला जागतिक तणाव, भारतात महागाई वाढणार?
तापमानात वाढ (Rising temperatures) आणि जागतिक तणाव यामुळं भारतातील महागाई (Inflation) वाढण्याची शक्यता आहे. सध्या देशात अन्नधान्य महागाईचा दर हा 8.52 टक्के आहे.
Inflation In India: देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. तापमानात (temperature) मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तापमानात वाढ (Rising temperatures) आणि जागतिक तणाव यामुळं भारतातील महागाई (Inflation) वाढण्याची शक्यता आहे. सध्या देशात अन्नधान्य महागाईचा दर हा 8.52 टक्के आहे. उष्णतेच्या लाटेमुळं हा महागाई दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
RBI ने दिलेल्या माहितीनुसार, हवामानातील बदल आणि जागतिक तणावामुळं महागाईत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच दुसऱ्या बाजूला इराण इस्त्राईल यांच्यातील युद्धाचा तणाव आहे. त्यामुळं महागाई वाढण्याची शक्यता आहे. चालू तिमाहीत म्हणजे जानेवारी ते मार्च महिन्यात किरकोळ महागाईत घट झाली होती. मात्र, एप्रिल महिन्यात काही प्रमाणात महागाई वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 2023 चा विचार केला तर त्यावेळी किरकोळ महागाईचा दर हा 5.7 टक्के होता.
कच्च्या तेलाच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता
अन्नधान्याच्या महागाईबरोबरच कच्च्या तेलाच्या किंमतीतही वाढ होऊ शकते. या महागाईचा मोठा फटका नागरिकांना बसू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या कच्चे तेल प्रति बॅलर 91 डॉलरवर पोहोचले आहे. या किंमती प्रति बॅलर 100 रुपयापर्यंत जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. आरबीआयने आर्थिक वर्ष 2024-25 च्या पतधोरणासंदर्भात बैठक घेतली. यामध्ये महागाई हा सर्वात मोठा धोका असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं महागाईच्या बाबतीत अत्यंत सावध राहणं गरजेचं असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले.
कर्ज घेणं देखील महागण्याची शक्यता
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, जर अन्नधान्याच्या आणि कच्च्या तेलाच्या महागाईत वाढ झाली तर कर्ज घेणं देखील महागण्याची शक्यता आहे. तसेच लोकांचं बचतीचं प्रमाम दखील कमी होणार आहे.
महागाईच्या मुद्यावरुन विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका
सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, महागाईच्या मुद्यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करताना दिसत आहे. सध्या इंधनाच्या वाढत्या किंमती, त्याचबरोबर डाळींच्या किंमतीत झालेली वाढ याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर पडत आहे. त्यामुळं विरोधक या मुद्यावरुन सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडत आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या काळात महागाई वाढू नये म्हणून सरकार विविध प्रयत्न करत आहे. तसेच आयात निर्यात धोरणात सातत्यानं बदल करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:
पूर्वी महागाई डायन होती आता डार्लिंग झालीये, गॅस दरवाढीवरुन काँग्रेसचा हल्लाबोल