(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Record Liquor Sale: वर्षभरात मद्याच्या दरात वाढ, तरीही तळीरामांनी एका वर्षात 5 अब्ज 'खंबे' रिचवले
Record Liquor Sale: मागील आर्थिक वर्षात मद्यविक्रीने नवा उच्चांक गाठला आहे.
Liquor Sale: मागील काही महिन्यांपासून महागाईने उच्चांक गाठला आहे. खाद्य पदार्थ, अन्नधान्यापासून सगळ्याच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. अशातच लोकांनी खर्च नियंत्रित ठेवण्यासाठी खरेदीचे प्रमाण कमी करत काटकसर सुरू केली. मात्र, दुसऱ्या बाजूला तळीरामांना महागाईची चिंता नसल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. मागील आर्थिक वर्षात मद्याच्या किमतीत वाढ झाली. मात्र, त्याचा परिणाम तळीरामांवर झाला नाही. मद्य विक्री मोठ्या प्रमाणावर झाली असल्याचे समोर आले आहे.
मद्याची विक्रमी विक्री
'इकॉनॉमिक्स टाइम्स'च्या वृत्तानुसार, मागील आर्थिक वर्षात भारतातील मद्यप्रेमींनी 750 मिलीच्या सरासरी सुमारे 4.75 अब्ज बाटल्या खरेदी केल्या. विक्रीचे आकडे असे दर्शवतात की दारूची मागणी प्रत्येक श्रेणीत होती. व्हिस्की, रम, ब्रँडी, जिन, व्होडका आदी सर्व प्रकारच्या मद्याची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. यामध्येही प्रीमियम म्हणजेच उच्च किंमतीच्या दारूची विक्री अधिक होती.
किती मद्य विक्री ?
आकडेवारीनुसार, एप्रिल 2022 ते मार्च 2023 दरम्यान, देशभरात 39.5 कोटी मद्याच्या बॉक्सची विक्री झाली. विक्रीचा हा आकडा त्या आधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 12 टक्के अधिक आहे. चार वर्षांपूर्वी सर्वाधिक मद्य विक्री नोंदवण्यात आली होती. वर्ष 2018-19 मध्ये जवळपास 35 कोटी बॉक्सची विक्री झाली होती. मागील आर्थिक वर्षात तळीरामांनी 4 कोटी बॉक्सची खरेदी केली.
मागील आर्थिक वर्षात किमतीत वाढ
गेल्या आर्थिक वर्षात जवळपास सर्वच कंपन्यांनी दारूच्या किमती वाढवल्या आहेत. प्रमुख मद्य कंपनी Pernod Ricard एका अधिकाऱ्याने गेल्या महिन्यात सांगितले की, 2022-23 मध्ये भारतात ज्या प्रकारे किंमती वाढल्या होत्या. त्यानंतरही ग्राहकांचा विश्वास कायम आहे. तसेच आगामी काळाबाबत त्यांनी भारतीय बाजाराकडून खूप अपेक्षा व्यक्त केल्या. ही कंपनी भारतात एंट्री लेव्हलवर रॉयल स्टॅग व्हिस्की, प्रीमियम सेगमेंटमध्ये बॅलेंटाइन, चिव्हास रीगल आणि द ग्लेनलिव्हेट सारखे ब्रँड आणि व्होडका सेगमेंटमध्ये अॅबसोल्युट ब्रँडच्या मद्याची विक्री करते.
ना बीअर, ना रम... 'या' दारुची भारतीयांना भुरळ
भारतीय मद्यपींना बीअर किंवा रम नाही तर स्कॉच व्हिस्कीने भुरळ घातली आहे. भारतात स्कॉच व्हिस्की पिणाऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती काही महिन्यापूर्वी प्रकाशित झालेल्या एका अहवालात समोर आली आहे. स्कॉच व्हिस्की पिण्यात भारतीय पहिल्या क्रमांकावर आहेत. इतकंच नाही तर भारतीयांनी याबाबतील जगातील सर्व देशांना मागे टाकलं आहे. 2022 मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, वर्षभरात भारतात स्कॉच व्हिस्कीच्या एकूण 219 दशलक्ष बाटल्यांचा खप झाला. 2021 मध्ये भारतात स्कॉच व्हिस्कीच्या एकूण 136 दशलक्ष बाटल्यांचा खप झाला होता. जगभरातून निर्यात होणाऱ्या स्कॉच व्हिस्कीच्या बाबतीत भारत अव्वल आहे.