(Source: ECI/ABP News/ABP Majha)
RBI Repo Rate Hike: महागाई अजूनही नियंत्रणाबाहेर! आरबीआय रेपो दरवाढ वाढवण्याची शक्यता
RBI Repo Rate Hike: किरकोळ महागाईत वाढ झाल्याने रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात वाढ होण्याची शक्यता असल्याचे मॉर्गन स्टॅनली या आर्थिक संस्थेने म्हटले.
RBI Repo Rate Hike: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (RBI) तीन दिवसीय पतधोरण आढावा बैठक (Monetary Policy Committee) 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान पार पडणार आहे. ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई दर पुन्हा एकदा 7 टक्क्यांच्या पातळीवर पोहचल्याने आरबीआय रेपो दरात पुन्हा वाढ करण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय फर्म मॉर्गन स्टॅनली यांनी आरबीआय व्याज दरात वाढ करण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. आरबीआय रेपो दरात 0.50 टक्क्यांची वाढ करू शकते.
मॉर्गन स्टॅनली यांनी आपल्या अहवालात म्हटले की, रेपो दरात 35 बेसिस पॉईंटची वाढ होऊ शकते असा याआधी आमचा अंदाज होता. मात्र, महागाई दरात होत असलेली वाढ आणि जगभरातील केंद्रीय बँका घेत असलेल्या भूमिका पाहता आरबीआय रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ करू शकते, असे मॉर्गन स्टॅनलीने म्हटले.
याआधी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 1.40 टक्क्यांची वाढ केली आहे. पहिल्यांदा मे महिन्यात 40 बेसिस पॉईंट, दुसऱ्यांदा जून महिन्यात 50 बेसिस पॉईंट आणि ऑगस्ट महिन्यात 0.50 टक्क्यांची वाढ रेपो दरात केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा रेपो दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
मॉर्गन स्टॅनली नुसार, खाद्यान्नांच्या महागाईमुळे सप्टेंबर महिन्यातील किरकोळ महागाई दर हा 7.1 टक्के ते 7.4 टक्के इतका राहू शकतो. पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत महागाई दरात घट होऊ शकते. जानेवारी-फेब्रुवारी 2023 या कालावधीत किरकोळ महागाई दर हा 6 टक्क्यांच्या आसपास राहू शकतो असा अंदाज मॉर्गन स्टॅनलीने व्यक्त केला आहे.
खाद्यान्नाच्या महागाईत वाढ होत असल्याने महागाई दरात तेजी दिसून येत आहे. कमोडिटीच्या किंमती वाढ आणि डॉलरच्या तुलनेते रुपया कमकुवत होत असल्याने आयात महाग होण्याचा धोका आहे. त्यामुळे किरकोळ महागाई दरात वाढ होऊ शकते.
>> रेपो रेट म्हणजे काय?
रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात. तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.
>> रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.