मोदींनी 9 लाख गुंतवले, आता मिळणार 13 लाख रुपये, पोस्टाची 'ती' योजना आहे तरी काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी केलेल्या आर्थिक गुंतवणुकीची माहिती देण्यात आली आहे.

मुंबई : आपल्याकडे असलेल्या पैशाचे मूल्य वाढावे म्हणून आपण ते वेगवेगळ्या योजनांत गुंतवतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी वाराणसी मतदारसंघातून नुकतेच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना मोदी यांनी त्यांनी केलेल्या गुंतवणुकीचा तपशील दिला आहेत. त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार मोदी यांनी पोस्ट ऑफिसच्या एका योजनेत 9 लाख 12 हजार रुपये गुंतवलेले आहेत. मोदींच्या या गुंतवणुकीची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. मोदींनी 9 लाख रुपये गुंतवलेली ही योजना नेमकी काय आहे? असे विचारले जात आहे. याच पार्श्वभूमीवर पोस्ट ऑफिसच्या या योजनेबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
नरेंद्र मोदी यांनी नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट (National Savings Certificate) म्हणजेच एनएससी या पोस्ट ऑफिसच्या योजनेत पैसे गुंतवले आहेत. NSC ही एक डिपॉझिट योजना असून पाच वर्षांसाठी या योजनेत पैशांची गुंतवणूक करता येते. सध्या या योजनेअंतर्गत गुंतवलेल्या रकमेवर 7.7 टक्क्यांनी व्याज मिळते.
या योजनेत कोण पैसे गुंतवू शकतो
या योजनेत कोणताही भारतीय नागरिक पैशांची गुंतवणूक करू शकतो. या योजनेअंतर्गत जॉइंट खाते खोलण्याचीही सुविधा आहे. विशेष म्हणजे दोन किंवा तीन लोक मिळूनदेखील या योजनेअंतर्गत खात खोलू शकतात. एखाद्या अल्पवयीन मुलाचे खाते त्याचे आई-वडील खोलू शकतात. 10 वर्षांपर्यंतचे मूल स्वत:च्या नावाने या योजनेत खाते चालू करू शकते. तुम्ही एकाच वेळी अनेक एनएससी खातेदेखील चालू करू शकता. या योजनेअंतर्गत 1000 रुपए गुंतवण्याची अट आहे. जास्तीत जास्त पैसे गुंतवण्यावर या योजनेत कोणतीही मर्यादा नाही. म्हणजेच तुम्हाला जेवढे पैसे गुंतवायचे तेवढे पैसे तुम्ही या योजनेत गुंतवू शकता. विशेष म्हणजे या योजनेत पैसे गुंतवल्यानंतर मिळालेल्या परताव्यावर आयकर कायदा 80C अंतर्गत फायदा मिळतो.
मोदींएवढी रक्कम गुंतवल्यास किती रिटर्न्स मिळणार
मोदी यांनी एनसीएस या योजनेत एकूण 9,12,000 रुपयांची गुंतवणूक केली आहे. तुम्हीदेखील एवढीच रक्कम या योजनेत जमा केल्यास पाच वर्षांनी तुम्हाला जमा रकमेवर 4,09,519 रुपये व्याज मिळेल. म्हणजेच मॅच्यूरिटीवर तुम्हाला एकूण 13,21,519 रुपये मिळतील. तुम्ही याच योजनेत 9 लाख रुपये गुंतवल्यास 4,04,130 रुपये व्याज मिळेल. मॅच्यूरिटीनंतर तुम्हाला 9 लाख रुपयांचे 13,04,130 लाख रुपये मिळतील.
1 ते 5 लाख रुपयांवर किती परतावा मिळणार?
1,00,000 रुपये गुंतवल्यास तुम्हाला 44,903 रुपए व्याज मिळेल. तर मॅच्यूरिटी झाल्यानंतर 1,44,903 रुपये मिळतील.
2,00,000 गुंतवल्यास 89,807 रुपए व्याज तर मॅच्यूरिटी अमाऊंट 2,89,807 रुपये मिळणार.
3,00,000 रुपये गुंतवल्यास 1,34,710 रुपए व्याज तर मॅच्यूरिटी अमाऊंट 4,34,710 रुपये मिळणार.
4,00,000 रुपये गुंतवल्यास 1,79,614 रुपये व्याज तर मॅच्यूरिटी अमाऊंट 5,79,614 रुपये मिळणार.
5,00,000 रुपये गुंतवल्यास 2,24,517 रुपये व्याज तर मॅच्यूरिटी अमाऊंट 7,24,517 रुपये मिळणार.
हेही वाचा :
पगार 10 लाख रुपये असला तरी शून्य कर, कसं शक्य आहे? जाणून घ्या नेमका फंडा काय?
SIP करताना 'ही' एक काळजी घ्या, अन्यथा मोठं नुकसान झालंच म्हणून समजा!
रॉकेटच्या वेगाने पैसे वाढणार, फक्त 15 वर्षांत व्हा करोडपती; जाणून घ्या 12-15-20 चा फॉर्म्यूला काय?
श्रीमंत व्हायचंय? मग फक्त 'या' पाच गोष्टी पाळा; संपत्ती वाढलीच म्हणून समजा!























