PM Kisan : पीएम किसानचा 19 वा हप्ता जारी होण्यापूर्वी 'ही' काम करुन घ्या, शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांची प्रतीक्षा
PM Kisan : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. पीएम किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये दिले जातात.
नवी दिल्ली : शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेच्या 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. देशभरातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेद्वारे एका वर्षामध्ये 6 हजार रुपये दिले जातात. शेतकऱ्यांना 18 व्या हप्त्याची रक्कम ऑक्टोबर महिन्यात देण्यात आली होती. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी वाशिममध्ये कार्यक्रम आयोजित करत शेतकऱ्यांच्या खात्यावर 18 व्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यात आली होती. आता शेतकरी 19 वा हप्ता कधी मिळणार याकडे या योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्याचं लक्ष लागलं आहे. शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी काही कामं पूर्ण करावी लागणार आहेत. त्यामध्ये जमीन पडताळणी आणि ईकेवायसी सारख्या गोष्टींची पूर्तता करणं आवश्यक आहे.
जमीन पडताळणी अन् ईकेवायसी करणं आवश्यक
पीएम किसान सन्मान योजनेचा 19 वा हप्ता जारी होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी काही कामं पूर्ण करुन घ्यावीत. त्यामध्ये तुम्हाला पीएम किसान सन्मान योजनेचा 19 वा हप्ता आणि पुढचे हप्ते विना अडथळा मिळावेत म्हणून यासाठी जमीन पडताळणी करुन घेणं आवश्यक आहे. योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं आवश्यक आहे. जे शेतकरी हे काम करुन घेणार नाहीत त्यांना पीएम किसानच्या या किंवा पुढचा हप्ता मिळणार नाही. तुम्ही पीएम किसानच्या वेबसाईटवर किंवा सीएससी सेंटरवर भेट देत ई केवायसी करुन घ्यावी.
तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर पीएम किसानच्या हप्त्याची रक्कम मिळणार नाही. पीएम किसानच्या हप्त्याची रक्कम मिळण्यासाठी आधार कार्ड आणि बँक खातं लिंक करुन घ्यावं.
तुमच्या खात्यात डीबीटीचा पर्याय ऑन नसेल तर तो देखील सुरु करुन घ्यावा लागेल. बँक खाते क्रमांक आणि आधार क्रमांक चुकीचा नोंदवला गेला असल्यास देखील पीएम किसानचा हप्ता अडकू शकतो.
पीएम किसानच्या रकमेत वाढ करण्याची शिफारस
कृषी विभागाशी संबंधित लोकसभेतील समितीनं पीएम किसान सन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये 12 हजार रुपये देण्यात यावेत अशी शिफारस केली आहे. म्हणजेच सध्या शेतकऱ्यांना 6 हजार रुपये मिळतात त्या रकमेत वाढ करण्यात यावी अशी शिफारस करण्यात आली आहे.
दरम्यान, पीएम किसान सन्मान योजनेची सुरुवात डिसेंबर 2018 मध्ये करण्यात आली होती. तेव्हापासून शेतकऱ्यांना 18 हप्त्यांमध्ये 36 हजार रुपये देण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.
इतर बातम्या :