Bank FD : रेपो दर घटला, आता बँकांच्या मुदत ठेवीवरील व्याजदरही कमी होण्याची शक्यता, त्याआधी 'हे' पाऊल उचला
Senior Citizen Bank FD : आरबीआयने रेपो दर कमी केल्यानंतर आता बँका लवकरच बचत योजनांवरील व्याजदर कपातीची घोषणा करू शकतात. बँकेने दर कपातीची घोषणा करण्यापूर्वीच काही गोष्टी कराव्या लागतील.

मुंबई : रिझर्व्ह बँकेने रेपो दर 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांवर आणला आहे. सर्वसामान्यांसाठी हे दिलासादायक आहे, कारण यामुळे कर्ज पुरवठादारांचा ईएमआय कमी होईल. याची दुसरी बाजू म्हणजे बँका व्याजदरही कमी करण्याची शक्यता आहे. यामुळे एकीकडे कर्ज घेणाऱ्यांना कमी व्याज द्यावे लागणार आहे, तर दुसरीकडे बँकांमध्ये पैसे ठेवणाऱ्यांनाही कमी व्याजदराने परतावा मिळणार आहे. बँका लवकरच विविध प्रकारच्या योजनांमध्ये व्याजदर कपातीची घोषणा करू शकतात.
बँक दर कपातीची घोषणा करण्यापूर्वी सावधगिरी बाळगली पाहिजे. ज्यांना आपले पैसे बँकेच्या मुदत ठेव योजनेत गुंतवायचे आहेत त्यांनी त्यासाठी काही पाऊले उचलावेत. त्यांना बँकांमध्ये लवकरात लवकर पैशांची एफडी करावी लागेल. आता FD ठेवल्यास त्यावरील रिटर्न हे आताच्या दरावरच निश्चित केला जाईल. बँकांनी व्याजदरात कपात केल्यानंतर तुम्ही एफडी केल्यास, त्यावेळचा कमी झालेला व्याजदर लावला जाईल. त्याचा परिणाम तुमचा एफडीवरील परतावा कमी होऊ शकतो.
ज्येष्ठ नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
तरुण किंवा नोकरी करणारे लोक FD ऐवजी गुंतवणुकीसाठी इतर गुंतवणुकीची साधने वापरू शकता. परंतु निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना हमी परतावा हवा असतो. त्यामुळे त्यांच्या अतिरिक्त पैशावर चांगला परतावा मिळवण्यासाठी त्यांना FD हा सर्वोत्तम पर्याय वाटतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी व्याजदर कमी व्हायच्या आधीच एफडीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. बँकांनी दर कपातीची घोषणा करण्यापूर्वी त्यांनी पैसे एफडीमध्ये ठेवावे. यामुळे त्यांना सध्याच्या दरानुसार चांगला परतावा मिळेल.
स्मॉल फायनान्स बँकांकडून 9.55 टक्क्यांपर्यंत परतावा
बँकांकडून दर कपातीची घोषणा होण्यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांनी एफडी केली नाही तर येत्या काही महिन्यांत त्यांना अशी संधी मिळणार नाही. सध्या स्मॉल फायनान्स बँका ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवर 9.55 टक्क्यांपर्यंत वार्षिक परतावा देत आहेत.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

