Cough Syrup : खोकल्यासाठी कफ सिरप घेताय? मग आधी ही बातमी वाचा
Cough Syrup : देशातील 50 हून अधिक कफ सिरप कंपन्या गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरल्या आहेत. सरकारच्या एका अहवालात ही बाब समोर आली आहे.
Cough Syrup : खोकला झाल्यावर अनेकजण कफ सिरप घेणे ही अगदी सामान्य बाब आहे. अनेकजण खोकल्यातून सुटका मिळवण्यासाठी कफ सिरपचा आधार घेतात. तुम्हीदेखील कफ सिरपचा आधार घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या बातमीने कदाचित तुमची चिंता वाढू शकते. देशात कफ सिरप तयार करणाऱ्या 50 हून अधिक कंपन्या या चाचणीत अनुतीर्ण झाल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी उज्बेकिस्तानमध्ये (Uzbekistan) 19 मुलांचा भारतात तयार झालेल्या कफ सिरपने मृत्यू झाला होता. त्यानंतर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले होते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कफ सिरप तयार करणाऱ्या कंपन्यांच्या औषधांची चाचणी करण्यात आली.
अहवालात काय म्हटले?
सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या (CDSCO) अहवालात म्हटले की ऑक्टोबरपर्यंत जारी केलेल्या 2,104 चाचणी अहवालांपैकी 54 कंपन्यांचे 128 किंवा 6 टक्के अहवाल मानक दर्जाचे (NSQ) नव्हते. उदाहरणार्थ, गुजरातच्या अन्न आणि औषध प्रयोगशाळेने ऑक्टोबरपर्यंत 385 नमुन्यांचे विश्लेषण केले, त्यापैकी 20 उत्पादकांचे 51 नमुने मानक दर्जाचे नसल्याचे आढळले. त्याचप्रमाणे, केंद्रीय औषध चाचणी प्रयोगशाळा (CDTL) मुंबईने 523 नमुन्यांचे विश्लेषण केले, त्यापैकी 10 कंपन्यांचे 18 नमुने गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरले.
प्रादेशिक औषध चाचणी प्रयोगशाळा (RDTL) चंदीगडने 284 चाचणी अहवाल जारी केले आणि 10 कंपन्यांचे 23 नमुने NSQ होते. इंडियन फार्माकोपिया कमिशन (IPC) गाझियाबादने 502 अहवाल जारी केले, त्यापैकी नऊपैकी 29 कंपन्या गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरल्या. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने 'इकॉनॉमिक्स टाइम्स'च्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने काय म्हटले?
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) सांगितले की गांबियातील सुमारे 70 मुलांचा मृत्यू हा भारतीय उत्पादकाने बनवलेल्या खोकला आणि सर्दी सिरपशी संबंधित असू शकतो. तेव्हापासून भारताने बनवलेले कफ सिरप स्कॅनरच्या कक्षेत आले आहे. या वर्षी मे महिन्यामध्ये, भारताचे औषध नियंत्रक जनरलने (DCGI) राज्य औषध नियंत्रकांना त्यांच्या सरकारी मालकीच्या NABL-मान्यताप्राप्त प्रयोगशाळांना निर्यातीच्या उद्देशाने कफ सिरपच्या उत्पादकांकडून प्राप्त नमुन्यांचे विश्लेषण प्रदान करण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश दिले होते.
WHO च्या अहवालाला प्रतिसाद म्हणून ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने राज्य औषध नियंत्रकांना निर्यात उद्देशांसाठी कफ सिरप उत्पादकांकडून प्राप्त नमुन्यांच्या विश्लेषणास प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) निर्यातदारांना त्यांच्या कफ सिरपची सरकारी प्रयोगशाळांमध्ये चाचणी घेणे आणि निर्यात करण्यापूर्वी विश्लेषणाचे प्रमाणपत्र (CoA) घेणे 1 जूनपासून बंधनकारक केले आहे