(Source: ECI/ABP News/ABP Majha)
निफ्टीने ओलांडला ऐतिहासिक 16000 अंकांचा टप्पा, तर सेन्सेक्सही 53,823 उच्चांक पातळीवर
निफ्टीमध्ये आज दिवसभरात 246 अंकांची वाढ होऊन निफ्टी 16130 अंकांवर बंद झाली. याआधी निफ्टीचा उच्चांक 15 हजार 962 होता. तर सेन्सेक्सही 873 अंकांनी वधारुन विक्रमी 53,823 पातळीवर बंद झाला.
मुंबई : शेअर बाजारात आज विक्रमी तेजी पाहायला मिळाली. गेल्या अनेक दिवसांपासून 16000 च्या टप्प्यापर्यंत जाऊन खाली येणाऱ्या निफ्टीने आज 16000 चा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. निफ्टीमध्ये आज दिवसभरात 246 अंकांची वाढ होऊन निफ्टी 16130 अंकांवर बंद झाली. याआधी निफ्टीचा उच्चांक 15 हजार 962 होता. तर सेन्सेक्सही 873 अंकांनी वधारुन विक्रमी 53,823 पातळीवर बंद झाला.
शेअर मार्केटमध्ये मंगळवारी टेक्नोलॉजी आणि कन्झ्युमर शेअरचे भाव वधारल्याने शेअर बाजारातही मोठी उसळी पाहायला मिळाली. लॉकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाल्यामुळे जुलै महिन्यात औद्योगिक काम मोठ्या प्रमाणावर सुरु झाले आहे. त्यामुळे उत्पादन क्षेत्रात भरघोस वाढ झाली . याचा देखील परिणाम शेअर मार्केटमध्ये दिसून आला आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
एचडीएफसी, टीसीएस, टायटन, इन्फोसिस या शेअर्समध्ये तेजी पाहायली मिळाली. या चार शेअर्समुळे एकत्रितपणे सेन्सेक्समध्ये 200 अंकाची वाढ पाहायला मिळाली. वोडाफोन आयडिया, इनॉक्स वाईंड लिमिटेड, इंड-स्विफ्ट लॅब्स, एलकेपी फायनान्स आणि कोसिन यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले. बीएसई मिड आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनी व्यापक बाजारपेठेत नवीन उच्चांक गाठले, इंट्राडे ट्रेडमध्ये 0.5% पर्यंत वाढ झाली.
निफ्टीच्या 1000 अंकांच्या वाढीमध्ये सुमारे 29 स्टॉक होते ज्यात 100 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. यामध्ये JSW Energy, Shree Renuka, Praj Industries, Lux Industries, Adani Total Gas, CDSL, KPIT Technologies आणि SAIL सारख्या समभागांची नावे समाविष्ट आहेत.
कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे आशियाई बाजारांमध्ये घसरण पाहायला मिळाली तर भारतीय बाजारात विक्रमी उच्चांक गाठला गेला. हँग सेंग (Hang Seng) आणि निक्केई (Nikkei) मध्ये घसरण पाहायला मिळाली.