Mutual Fund : SIP द्वारे म्युच्युअल फंडमध्ये पैशांचा ओघ वाढला, डिसेंबरमध्ये विक्रमी 31 हजार कोटींची गुंतवणूक, फ्लेक्सी कॅपमध्ये सर्वाधिक इनफ्लो
SIP : भारतीय शेअर बाजाराला एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीनं नवा विक्रम रचला आहे. डिसेंबरमध्ये 31 हजार कोटींची गुंतवणूक म्युच्युअल फंडमध्ये झाली.

AMFI December 2025 Data मुंबई :भारतीय गुंतवणूकदारांकडून म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीद्वारे जोरदार गुंतवणूक सुरु आहे.डिसेंबरमध्ये एसआयपीनं नवा विक्रम केला आहे. एसआयपीद्वारे गुंतवणुकीची रक्कम डिसेंबर महिन्यात पहिल्यांदा 31 हजार कोटींवर पोहचली आहे. मात्र, इक्विटी म्युच्युअल फंडमधील इनफ्लो नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत 6 टक्क्यांनी घसरुन 28054 कोटींवर आला आहे. इक्विटी फंडसमध्ये फ्लेक्सी कॅपची कामगिरी चांगली सुरु आहे. गेल्या महिन्यात या कॅटेगरीत 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली होती.तज्ज्ञांच्या मते गुंतवणूकदारांना भारताचा विकास आणि दीर्घकालीन दृष्टिकोणामुळं बाजारावर विश्वास आहे.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबर महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये 28054 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. नोव्हेंबरमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये 29911 कोटींची गुंतवणूक आली होती. तर ऑक्टोबर महिन्यातील गुंतवणूक 24690 कोटी होती. एसआयपीनं नवं रेकॉर्ड केलं आहे, रिटेल गुंतवणूकदारांनी डिसेंबरमध्ये एसआयपीद्वारे 31002 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. नोव्हेंबर महिन्यात एसआयपीद्वारे इनफ्लो 29445 कोटी रुपये आहे. दुसरीकडे डेब्ट फंडमधून पैसे काढले जात आहेत. तर, हायब्रीड कॅटेगरीत सकारात्मक गुंतवणूक पाहायला मिळाली. गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूकदारांचा कल दिसून येतोय.
ओम्नीसायन्स कॅपिटलचे सीईओ आणि मुख्य गुंतवणूक रणनीतीकार डॉ. विकास गुप्ता यांनी म्युच्युअल फंड इंडस्ट्रीत सातत्यानं पैसे येत आहेत, ज्यानं स्पष्ट होतं की गुंतवणूकदारांना भारताच्या अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारात दीर्घकाळासाठी विश्वास आहे. शेअर बाजारात मागील एक वर्ष तेजी आणि घसरणीचं राहिलं आहे. सोने आणि चांदीत दमदार परतावा मिळाल्यानं मल्टी असेटस फंड्समध्ये गुंतवणूक वेगानं वाढली आहे. सोने आणि चांदीच्या दरात आता अधिक गुंतवणूक करणं थांबवलं पाहिजे कारण यात खूप तेजी आल्याचं त्यांनी म्हटलं.
अब्बेकस म्युच्युअल फंडचे सीईओ वैभव चुग यांच्या मते भारताची अर्थव्यवस्था मजबूत दिशेनं जातेय. गेल्या दीज वर्षात बाजारात वेळेनुसार सुधारणा झाली आहे. भू राजनैतिक घडामोडी आणि टॅरिफच्या मुद्यावर काय होईल, हे सांगता येत नसल्यानं गुंतवणूकदार हळू हळू एसआयपी करण्यास प्राधान्य देत आहेत.
एम्फीच्या आकडेवारीनुसार इक्विटी फंडमधील गुंतवणूक घटण्यासह म्युच्युअल फंड इंडस्ट्रीतील एकूण असेट अंडर मॅनेजमेंट देखील कमी झाली आहे. डिसेंबरमध्ये थोड्या प्रमाणात घसरण झाली आहे. AUM मध्ये घसरण होऊन ते 80.23 लाख कोटींवर आलं आहे. नोव्हेंबरमध्ये ते 80.80 लाख कोटी होतं. डेब्ट म्युच्युअल फंडमधून मोठ्या प्रमाणात रक्कम काढल्याचा हा परिणाम आहे.
डिसेंबर महिन्यात म्युच्युअल फंड उद्योगातून 66591 कोटींचा आउटफ्लो दिसून आला. इक्विटी आणि गोल्ड फंडमध्ये गुंतवणूक कायम आहे. मात्र, डेब्ट फंडमधून पैसे काढले गेल्यानं म्युच्युअल फंड इंडस्ट्री दबावात आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)























