मुंबईत मालमत्ता नोंदणी 19 टक्क्यांनी घटली, मे महिन्यात 9,523 घरांची नोंदणी
Knight Frank Index: मुंबईत एप्रिल महिन्याच्या तुलनेत मालमत्ता खरेदीत मे महिन्यात (2022) 19 टक्क्यांनी घट झाली आहे. मुंबई शहरात मे 2022 मध्ये 9,523 घरांच्या खरेदीची नोंदणी करण्यात आली आहे.
Knight Frank Index: मुंबईत एप्रिल महिन्याच्या तुलनेत मालमत्ता खरेदीत मे महिन्यात (2022) 19 टक्क्यांनी घट झाली आहे. मुंबई शहरात मे 2022 मध्ये 9,523 घरांच्या खरेदीची नोंदणी करण्यात आली आहे. ज्यामुळे राज्य सरकाराच्या तिजोरीत 709 कोटी रुपये महसूल जमा झाला आहे. देशातील अग्रगण्य रिअल इस्टेट कन्सलटंन्सी कंपनी असलेल्या नाईट फ्रॅन्क इंडियाच्या (Knight Frank India) अहवालातून ही बाब समोर आली आहे. असं असलं तरी मागील वर्षी म्हणजे मे 2021 च्या तुलनेत या वर्षी अधिक घरांची विक्री झाली आहे. मागील वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रभावामुळे घरांच्या विक्रीत घसरण झाली होती.
नाईट फ्रॅन्क इंडियाच्या (Knight Frank India) अहवालानुसार, मे 2022 मध्ये घरांची झालेली विक्री ही या (May Month) महिन्यात होणाऱ्या 10 वर्षातील सर्वाधिक विक्री आहे. तसेच मासिक राज्य महसूल संकलन मे महिन्यासाठी 10 वर्षांच्या उच्चांकावर आहे. मालमत्ता नोंदणीमध्ये 1 कोटी आणि त्याहून अधिक किंमत असलेल्या 54 टक्के घरांचा समावेश आहे. तसेच 500-1,000 स्क्वेअर फूट श्रेणीतील घरांची सर्वाधिक विक्री झाली आहे. मे महिन्यात (2022) मालमत्ता नोंदणीतून 709 कोटींचा मसूल जमा झाला आहे. जो 2021 मध्ये 269 कोटी रुपये इतका होता. मे 2022 मध्ये 307 घरांच्याच्या सरासरी दैनंदिन विक्री दराने 164 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली आहे.
याबाबत बोलताना नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल म्हणाले की, “महागाईचा दबाव, वाढता इनपुट खर्च आणि मुद्रांक शुल्कात झालेली वाढ, इतकं सर्व असूनही मुंबईतील रिअल इस्टेट बाजार स्थिर राहिला आहे. लोकांच्या मानसिकतेत बदलत होत असल्याने गृह खरेदीदार दीर्घकालीन स्थिरतेसाठी मालमत्ता खरेदीला महत्व देत आहेत. यातूनच आर्थिक दृष्टिकोनातून घर खरेदीचा वेग कायम आहे.''
दरम्यान, मेट्रो सेस वाचवण्यासाठी आगाऊ खरेदी करणाऱ्या खरेदीदारांनी मे 2022 मध्ये खरेदी केलेल्या मालमत्तेची नोंदणी करणे सुरू ठेवले. एप्रिल आणि मे 2022 मध्ये नोंदणी करताना मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी घर खरेदी सुरू ठेवली. ज्यामुळे व्यवहार करताना 1 टक्के मेट्रो सेसची बचत केली जाऊ शकेल. मे 2022 मध्ये निष्पादित केलेल्या मालमत्ता नोंदणीपैकी तब्बल 37 टक्के नोंदणी 5 टक्के प्रभावी मुद्रांक शुल्क दराने मार्च 2022 मध्ये दाखल करण्यात आली होती.