आजचा दिवस मुकेश अंबानींचा, शेअर बाजार उघडताच कमावले 76425 कोटी, 6 महिन्यानंतर प्रथमच एवढी वाढ
एकीकडे शेअर बाजारात घसरण सुरू असतानाच दुसरीकडे मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ होत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज 6 महिन्यांनंतर प्रथमच अशी वाढ पाहत आहे.
Mukesh Ambani : आजचा दिवस उद्योगपती मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani ) नावावर झालं असं म्हणलं तर काही वेगळं ठरणार नाही. कारण, व्यापार सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी एकीकडे शेअर बाजारात घसरण सुरू असतानाच दुसरीकडे मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज 6 महिन्यांनंतर प्रथमच अशी वाढ पाहत आहे. काल मुकेश अंबानी यांनी RIL चे ऑक्टोबर-डिसेंबर तिमाही निकाल सादर केले आहेत, ज्याचा परिणाम स्टॉकवर दिसून येत आहे. इशा आकाश आणि अनंत यांच्या तीन कंपन्यांनी तिमाही निकालात चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे मुकेश अंबानींनी एका दिवसात तब्बल 76425 कोटींची कमाई केली आहे.
शेअर्समध्ये मोठी तेजी
शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात कमकुवत सुरुवात झाली असली तरी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (आरआयएल) समभागांनी जोरदार सुरुवात केली. आरआयएलने सुरुवातीच्या व्यापारात 4.5 टक्क्यांची उसळी घेतली. मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर काल 1,266.45 च्या पातळीवर बंद झाला होता. त्यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप 17,19,158.86 रुपये होते. आज सुमारे 4.5 टक्क्यांच्या वाढीसह बीएसईवर शेअर 1325.10 वर उघडला. गेल्या आठवडाभरात शेअरमध्ये हालचाल झाली असून तो सुमारे 4.5 टक्क्यांनी वाढला आहे. आज बाजार उघडताच मुकेश अंबानींच्या कंपनी रिलायन्सचे मार्केट कॅप 17,95,583.99 वर पोहोचले. म्हणजे शेअर बाजार उघडताच मुकेश अंबानींना 76 हजार कोटी रुपये मिळाले आहेत.
त्रैमासिक निकालाचा परिणाम
रिलायन्सच्या चांगल्या त्रैमासिक निकालाचा परिणाम शेअरच्या वाटचालीवर दिसत आहे. ऑक्टोबर-डिसेंबर 2024 या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 7.4 टक्के वाढ झाली आहे आणि महसूल 7 टक्क्यांनी वाढला आहे. त्याच्या डिजिटल युनिट Jio Infocomm ने ऑक्टोबर-डिसेंबर 2024 दरम्यान कंपनीची कमाई आणि नफा वाढवण्यात मोठी भूमिका बजावली आहे. जिओ इन्फोकॉमचा नफा 24 टक्क्यांनी वाढला आहे. याशिवाय, रिलायन्स रिटेल व्हेंचर्सने ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिसऱ्या तिमाहीत 3,458 कोटी रुपयांचा नफाही कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीला 3,145 कोटी रुपयांचा नफा झाला होता. अशा परिस्थितीत, रिलायन्स रिटेल व्हेंचर्सचा YOY (वर्षानुवर्षे) नफा 10 टक्क्यांनी वाढला आहे.
निकालानंतर ब्रोकरेज हाऊसनी RIL वर गुंतवणूक धोरण जारी केले आहे. बहुतांश दलालांनी शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मिरे ॲसेट शेअरखानने रिलायन्स इंडस्ट्रीजवर 1827 च्या लक्ष्य किंमतीसह खरेदी सल्ला कायम ठेवला आहे. तर मोतीलाल ओसवाल यांनी शेअरला 1600 रुपयांचे टार्गेट दिले आहे.