अमेरिकेतून भारतासाठी वाईट बातमी, मॉर्गन स्टेनलीनं दिला धक्का, सेन्सेक्सबाबत महत्त्वाची भविष्यवाणी
Morgan Stanley BSE Sensex Report: ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टेनलीनं भारतीय कंपन्यांच्या कमाईचा अंदाज 13 टक्क्यांपर्यंत घटवला आहे. जागतिक बाजारातील मंदीचा परिणाम भारताच्या कामगिरीवर होऊ शकतो.

Morgan Stanley BSE Sensex Report नवी दिल्ली : तुम्ही जर शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मॉर्गन स्टेनलीनं 2025 साठी बीएसई सेन्सेक्सचं नवं टारगेट जाहीर केलं आहे. ते 93000 अंकांवरुन घटवून 82000 हजारंवर आणलं आहे. म्हणजेच जवळपास 12 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. मात्र, मॉर्गन स्टेनलच्या मतानुसार डिसेंबर 2025 पर्यंत सेन्सेक्समध्ये 9 टक्के तेजी पाहायला मिळू शकते. मात्र, पहिल्यांदा जितका अंदाज वर्तवला होता त्यापेक्षा कमी वाढ अंदाजित करण्यात आली आहे.
टारगेट का घटवलं?
ब्रोकरेज फर्मनं म्हटलं की त्यांनी भारतीय कंपन्यांच्या कमाईचा अंदाज जवळपास 13 टक्क्यांनी घटवला आहे. जागतिक बाजारातील शिथिलतेचा भारतावर परिणाम होऊ शकतो. भारत इतर देशांच्या तुलनेत चांगली कामगिरी करत असला तरी सेन्सेक्सची हालचाल पहिल्या अंदाजाप्रमाणं दिसत नाही, त्यामुळं मॉर्गन स्टेनलीनं अंदाज 12 टक्क्यांनी घटवला आहे.
रिपोर्टनुसार आता बाजाराचा फोकस मॅक्रो फॅक्टर्स वरुन स्टॉक् सिलेक्शन वर आला आहे. मॉर्गन स्टेनलनं त्यांच्या पोर्टफोलिओत सक्रिय पोझिशन घटवल्या आहेत. विभागानिहाय विचार केल्यास फायनान्शिअल, ग्राहक सेवा, इंडस्ट्रियल क्षेत्राला प्राधान्य देण्यात आलं आहे. तर, ऊर्जा, मटेरियल्स , यूटिलिटीज आणि आरोग्य सेवा या क्षेत्रांना कमजोर कॅटेगरीत ठेवण्यात आलं आहे. याशिवाय स्मॉल, मिडकॅप शेअर्स ऐवजी प्राधान्य लार्जकॅपला देण्यात आलं आहे.
2028 पर्यंत सेन्सेक्सची कमाई वार्षिक 16 टक्क्यांच्या दरानं वाढण्याचा अंदाज
मॉर्गन स्टेनलीच्या अंदाजानुसार भारताची अर्थव्यवस्था राजकोषीय शिस्त कायम ठेवण्यात यशस्वी ठरली, खासगी गुंतवणुकीत तेजी आली आणि वास्तविक विकास आणि रिअल इंटरेस्ट रेट यांच्यातील अंतर संतुलित राहिल्यास सेन्सेक्स त्यांचं नवं उद्दिष्ट गाठण्यात यशस्वी ठरेल. रिपोर्टमध्ये हे देखील सांगण्यात आलंय की 2028 पर्यंत सेन्सेक्सची कमाई वार्षिक 16 टक्क्यांनुसार वाढू शकते. परिस्थिती सुधारली, जीएसटीच्या दरांमध्ये कपात, सरकारद्वारे मोठ्या सुधारणा, कृषी कायद्यांबाबत स्थिती सुधारल्यास सेन्सेक्स 91000 पर्यंत जाऊ शकतो.
दरम्यान, अमेरिकेनं जगभरातील विविध देशांवर परस्परशुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला 90 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयांचा परिणाम भारतासह जगभरातील शेअर बाजारांवर झाला आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)























