Mhada Lottery 2024 : म्हाडाचा मुदतवाढीचा निर्णय गेमचेंजर ठरला, मुंबईतील घरांसाठी लाखांहून अधिक अर्ज, जाणून घ्या आकडेवारी
Mhada Mumbai Lottery : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीसाठी देण्यात आलेली मुदतवाढ संपली आहे. आता अर्जदारांचं लक्ष सोडतीकडे लागलं आहे.
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील विविध भागातील 2030 घरांसाठी अर्ज मागवले होते. म्हाडानं या घरांसाठी नोंदणी अर्ज दाखल करण्यासाठी दिलेली मुदत संपली आहे. म्हाडानं पहिल्यांदा अर्ज दाखल करण्यासाठी 4 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर ती वाढवून 19 सप्टेंबर करण्यात आलेली होती. म्हाडाचा हाच निर्णय गेमचेंजर ठरला असून एक लाखांहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे.
म्हाडानं मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड इ. गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील 2030 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केलेली होती. या घरांसाठी अर्ज नोंदणीला पहिल्या टप्प्यात फार प्रतिसाद मिळाला नव्हता. म्हाडानं यानंतर विकासकांकडून मिळालेल्या 370 घरांच्या किमती कमी केल्या होत्या. त्याचवेळी मुदत 15 दिवसांनी वाढवली होती. मिळालेल्या माहितीनुसार म्हाडाकडे मुदत संपेपर्यंत 134344 अर्ज दाखल करण्यात आले होते. तर, 113568 अर्जांची अनामत रक्कम जमा करण्यात आली होती.
मुदतवाढीचा निर्णय गेमचेंजर
म्हाडानं पहिल्यांदा अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरु केली तेव्हा अर्ज दाखल करण्यासाठी केवळ 26 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. 9 ऑगस्टपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली होती. ती मुदत 4 सप्टेंबरपर्यंत होती. त्यानंतर म्हाडानं 19 सप्टेंबरला दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज सादर करण्यासाठी मुदत दिली होती. ती मुदत रात्री बारा वाजेपर्यंत वाढवण्यात आली होती. यामुळं मोठ्या संख्येनं अर्जदारांनी अर्ज केले.
सर्वांचं लक्ष सोडतीकडे
म्हाडाच्या नियोजनानुसार आगामी काळात अर्जदारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. अंतिम यादी 3 ऑक्टोबरला प्रकाशित होणार आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथील कार्यक्रमात म्हाडाकडून 8 ऑक्टोबर रोजी लॉटरी काढली जाणार आहे. या लॉटरीत कुणाला घरं लागणार या कडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घरं?
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030घरांच्या लॉटरीपैकी अत्यल्प उत्पन्न गटासाठी 359 घरं, अल्प उत्पन्न गटासाठी 627 सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी 768 सदनिका, उच्च उत्पन्न गटासाठी 276 घरं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडाच्या मुंबई मंडळाने बांधलेल्या 1327 सदनिका, विकास नियंत्रण नियमावली 33 (5), 33 (7) व 58 अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा म्हणून म्हाडाला मिळालेल्या 370 आणि मागील सोडतीतील विविध वसाहतीतील विखुरलेल्या333 सदनिकांचा समावेश आहे.
इतर बातम्या :