Mhada Lottery 2024 : 370 घरांच्या किंमती कमी केल्या पण म्हाडानं कुर्ल्यातील 'त्या' घरांच्या किंमती 13 लाख रुपयांनी वाढवल्या, कारण समोर
Mhada Lottery 2024: म्हाडानं मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीसाठी लॉटरी जाहीर केली होती. काही दिवसांनी म्हाडानं 370 घरांची किंमत कमी केली होती.
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (Mhada ) मुंबई मंडळाकडून विविध भागातील 2030 घरांसाठी (Mhada Lottery 2024) लॉटरी जाहीर करण्यात आली होती. मुंबईतील विविध भागांतील 2030 घरांसाठी नोंदणी 9 ऑगस्टपासून सुरु झाली होती. सुरुवातीला घरांच्या नोंदणीसाठी 4 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. म्हाडानं मुंबईकरांच्या मागणीचा विचार करुन 15 दिवसांची मुदतवाढ दिली होती. याच सोबत म्हाडानं विकासकांकडून मिळालेल्या 370 घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला होता. विकासकांकडून मिळालेल्या 370 घरांच्या किंमती साधारणपणे 12 लाख ते 75 लाख रुपयांनी कमी झाल्या होत्या. मात्र, म्हाडानं मुंबईतील कुर्ला येथील 14 घरांच्या किंमती वाढवल्या असल्याची बाब समोर आली आहे. नवभारत टाइम्स या हिंदी वृत्तपत्रानं याबाबत वृत्त दिलं आहे.
कोणत्या घरांच्या किंमती वाढल्या?
म्हाडानं मुंबई मंडळाच्या लॉटरीची जाहिरात 8 ऑगस्ट रोजी जारी केली होती. त्या जाहिरातीनुसार मुंबईतील 2030 घरांसाठी अर्ज नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्या जाहिरातीत स्वानंद सहकारी गृहनिर्माण सोसायटी इमारत क्रमांक 33 नेहरुनगर, कुर्ला येथील 14 घरांची किंमत 43.97 लाख ते 45.40 रुपये निश्चित करण्यात आली होती. मात्र, काही दिवसानंतर या घरांची किंमत साधारणपणे 13 लाख रुपयांनी वाढवण्यात आली.43.97 लाखांच्या घरांची किंमत 56.79 रुपये तर 45.40 लाख रुपयांच्या घरांची किंमत 58.63 लाख रुपये करण्यात आली आहे.
म्हाडानं काय म्हटलं?
म्हाडानं या 14 घरांच्या किंमती का वाढल्या यासंदर्भात त्यांची बाजू मांडली आहे. या घरांच्या किंमती वाढण्यामागं मूल्यांकनात गडबड झाल्याचं म्हटलं आहे. म्हाडातील एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार कुर्ला येथील घरांची किंमत 77540 रुपयांच्या रेडीरेकनर दरानुसार निश्चित करण्यात आली होती. मात्र, त्या परिसरातील रेडी रेकनरचा दर 1 लाख 25 हजार 170 रुपये होता. ही बाब समोर आल्यानंतर 20 टक्के कपात निश्चित करुन 1 लाख 136 रुपये रेडी रेकनरनुसार घरांची किंमत निश्चित करण्यात आल्याचं म्हाडाच्या अधिकाऱ्यानं म्हटलं.
म्हाडानं मुंबईतील घरांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयानुसार 19 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मुंबईतील घरांची सोडत 8 ऑक्टोबरला काढण्यात येणार आहे. 9 ऑक्टोबरपासून ज्या व्यक्तींना घरं लागलेली नाहीत त्यांची अनामत रक्कम परत करण्यास सुरुवात केली जाणार आहे. ज्या नागरिकांना मुंबईतील घरांच्या सोडतीसाठी अर्ज नोंदणी करायची आहे, त्यांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करणं आवश्यक आहे.
इतर बातम्या :
मोठी बातमी! अखेर लिपिक पदासाठीची 'ती' अट रद्द; BMC मधील 1846 जागांसाठी नव्याने जाहिरात